मिरज : आरक्षित रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्या आशिष विजय रावळ (वय २३ रा. इचलकरंजी) या रेल्वे तिकीट एजंटास मिरजेत रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने अटक केली. सुट्टीचा हंगाम असल्याने कारवाई करुनही तिकीट एजंटांचा काळाबाजार सुरुच असल्याचे समोर आले आहे. सुट्टीचा हंगाम असल्याने सर्वच रेल्वेगाड्यांच्या आरक्षित तिकिटांना मोठी मागणी आहे. मात्र अवैध रेल्वे तिकीट एजंट प्रवाशांची तिकिटांसाठी अडवणूक करीत आहेत. आज मिरज रेल्वे स्थानकात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्या आशिष विजय रावळ (वय २३ रा. इचलकरंजी) यास रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून ९ हजार ४०० रुपये किमतीची ८ आरक्षित रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली. रावळ याच्याकडून जप्त केलेली तिकिटे विविध एक्स्प्रेस गाड्यांची व लांब पाल्ल्याची आहेत. रेल्वेच्या आरक्षित तिकिटांचा काळबाजार करणार्या एजंटांवर कारवाई करुनही अद्याप काळाबाजार सुरुच असल्याचे यामुळे समोर आले आहे. दरम्यान, सांगलीतही रेल्वे एजंटांकडून तिकिटांचा काळाबाजार होत आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
तिकिटांचा काळाबाजार; रेल्वे एजंटास अटक
By admin | Published: May 09, 2014 12:13 AM