शिराळा
: शिराळा तालुका व्यापारी संघटना व शिराळा व्यापारी महासंघाच्या वतीने वस्तू आणि सेवाकरातील जाचक तरतुदींच्या निषेधार्थ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सकडून (कॅट) पुकारण्यात आलेल्या आंदाेलनाच्या समर्थनार्थ तालुक्यात शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार, व्यवहार बंद होते.
देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर व्यावसायिकांचे काम सोपे होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, जीएसटी कायद्यामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये १०० वेळा सुधारणा झाल्यामुळे ही करप्रणाली अतिशय किचकट व गुंतागुंतीची ठरत आहे. अनेक छोट्यामोठ्या उद्योगांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. व्यापाऱ्याकडून छोटीशी जरी चूक झाली, तर दंडाबरोबर कारावासाच्या शिक्षेची तरतूद या करप्रणालीत आहे. यामुळे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने शुक्रवारी बंद पुकारला हाेता. यामध्ये शिराळा तालुक्यातील व्यावसायिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले हाेते.