दिलीप मोहितेकुरळप : देश प्रगतीपथावर जात असल्याचे एकीकडे समाधान वाटत असले, तरी यांत्रिकीकरणामुळे कुरळपसह परिसरातील वडार व राठोड समाजातील लोकांना काम मिळत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जेसीबी, पोकलेनमुळे विहीर खोदाई आठवड्यात होत असल्यामुळे वडार समाजातील लोकांच्या हातातील खोरी, टिकाव, पाट्या यासारखी हत्यारे जाऊन हातात खुरपी घेऊन शेतामध्ये भांगलणी करून आपला उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे.पूर्वी विहिरी खोदणे, गटारी काढणे, शेतातील पाइपलाइन काढणे यासारखी अवजड कामे वडार समाजाकडून करून घेतली जात होती. एक विहीर खोदण्यासाठी दहा ते पंधरा लोक लागायचे. हे काम एक ते दोन महिने सुरू असायचे. यामुळे हातात चार पैसे आल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालून मुलांचे शिक्षणही व्यवस्थित होत होते. मात्र, सध्याच्या आधुनिक युगात जेसीबी, पोकलेन सारख्या मशिनरी आल्याने दिवसाचे काम तासात होऊ लागले. तसेच एक विहीर आठवड्यात पूर्ण होत आहे. यामुळे वेळेची व पैशांची बचत होत असल्याने जेसीबी, पोकलेनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि विहिरी काढण्यापासून ते नाले काढण्यापर्यंत या यांत्रिकी मशीनचा सर्रास वापर होऊ लागला. यामुळे वडार समाजातील लोकांच्या हातातील खोरी, टिकाव, पाट्या सारखी हत्यारे जाऊन हातात खुरपी घेऊन शेतामध्ये भांगलणी करून आपला उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. मात्र, शेतीच्या कामातून मिळणाऱ्या पैशातून आमचा घरसंसार, मुलांचे शिक्षण व इतर खर्च भागत नसल्याची खंत कुरळप येथील अशोक वडार यांनी बोलून दाखवली. तर नवीन आलेल्या पाइप लिकेज मशिनरीमुळे मागील दोन-तीन वर्षांपासून शेतातील पाइपलाइन लिकेजचे काम मिळणेसुद्धा बंद झाले आहे.
जेसीबी वडार समाजाच्या मुळावरजेसीबीसारखे यांत्रिकी मशीन हे वडार समाजाच्या मुळावर आले आहे. या मशिनरीमुळे आमची रोजंदारी बंद झाली. त्यातच पूर्वीपासून खोदकामासारखी अवजड कामे केल्यामुळे आता शेतातील सरीत बसून भांगलणे अवघड होत आहे. शिवाय यातून मिळणाऱ्या पैशांतून आमच्या घरचा खर्च व मुलांचे शिक्षण होत नसल्याने वडार समाजावर आर्थिक संकटाचा डोंगर वाढला आहे. - अशोक वडार