सांगली : कृष्णा नदी उशाला असतानाही सांगली शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेदिवस गंभीर बनत चालला आहे. गावभागापाठोपाठ शहरातील शामरावनगरमधील पाच ते सहा कॉलनीत महिनाभरापासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. बुधवारी नागरिकांनी दूरध्वनीवरून पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी जाब विचारल्या. अखेर महापालिकेला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली.शामरावनगर परिसरातील सुंदर कॉलनी, समता कॉलनी, जनता बँक कॉलनी, मदरसा परिसर, विठ्ठल कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनीसह विविध गल्ल्यात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने नागरिकांनी महिनाभर अपुऱ्या पाण्यावर तहान भागविली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडेही तक्रारी करण्यात आल्या. पण या विभागानेही दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला.
सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी यांच्यामार्फत नागरिकांनी अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून जाब विचारला. त्यानंतर महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. दुपारपर्यंत दोन टँकर पाठविण्यात आले. कोरोनामुळे गर्दी करण्यास बंदी आहे. टँकर आल्यानंतर नागरिकांनी पाण्यासाठी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागली. प्रत्येक घरासमोर टँकर उभा करून पाणी देण्यात येत होते.या परिसराला पाणीपुरवठा सुरळीत व्हावे, यासाठी कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणीजवळ नवीन पाणी टाकी उभारण्यात आली. या टाकीतून पाणीपुरवठाही सुरू झाला. पण शामरावनगरचा पाणीप्रश्न काही सुटलेला नाही. महापालिकेकडून या टाकीतून चोवीस तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. पण अजूनही शामरावनगरमधील अंतर्गत गल्लीमध्ये अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.