विकास शहा शिराळा : मांगरूळ (ता. शिराळा) गावचे एकेकाळचे तुफानी मल्ल, राष्ट्रीय पैलवान संजय खांडेकर यांच्यावर आज वाहनचालक म्हणून काम करण्याची वेळ आली आहे.शिराळा तालुक्यातील मांगरूळला पैलवानकीचा वारसा आहे. अनेकजण देशपातळीवर यशस्वी झाले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते झाले, पण संजय विकास खांडेकर उपेक्षित राहिले. खांडेकर यांचे कुटुंब गरीब. आई-वडील शेतमजूर. संजयला लहान भाऊ व बहीण आहे.
संजयला लहानपणापासून तालमीचा नाद होता. पण घरी दूध नसायचे. भाजी-भाकरी खाऊन तो तालमीत मेहनत करत असे. शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये तो विभागापर्यंत लढला. त्याचा उत्साह पाहून मांगरूळचे त्यावेळचे पंचायत सदस्य पैलवान रंगराव पाटील (बापू) यांनी आपल्या दूध संस्थेतील दूध संजयला चालू केले.पैलवान संजय शिंदे (दादा) हे त्यावेळी मोठे पैलवान होते. ते संजय खांडेकर याचा सराव घेत. पुढे संजयने महाराष्ट्राला पदक मिळवून दिले. नंतर तो साई स्पोर्टस् क्लब, कांदिवली येथे चाचणी देण्यासाठी मुंबईत आला. याच साई स्पोर्टस्च्या माध्यमातून तो राष्ट्रीय चॅम्पियनसुद्धा झाला. त्याने नोकरीसाठी रेल्वेला प्रस्ताव पाठविला. सर्व अटी पूर्ण करून प्रस्ताव दिला. मात्र त्यास केराची टोपली दाखवून त्यास बाहेर काढण्यात आले आणि तिथेच संजय खचला.संजयने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला. अनेक मित्रांनी त्याला पुन्हा प्रयत्न करू, परत यश मिळेल, असा विश्वास दिला; पण एकदा मनाने खचलेल्या माणसाला पुन्हा उभे राहणे अवघड असते. प्रामाणिक खेळाला किंमत नसून, वशिलेबाजीला जास्त किंमत आहे आणि आपले वडील गरीब आहेत.
त्यामुळे वशिला लावृ शकत नाहीत. त्यापेक्षा गावाकडे जावे आणि त्यांना हातभार लावावा, या विचाराने तो माघारी फिरला आणि वडिलांबरोबर शेतात राबू लागला. पुढे संजयचे लग्न झाले; पण पाठीमागे लागलेले गरिबीचे ग्रहण काही सुटता सुटेना. त्यामुळे त्यांनी घर चालविण्यासाठी पुणे गाठले आणि तेथे टॅक्सीचालकाची नोकरी स्वीकारली.