सांगली : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाविरोधात प्रतिआंदोलन उभे करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सांगलीत राज्यस्तरीय ओबीसी महाएल्गार मेळावा घेण्यात येईल, अशी माहिती ओबीसी समाजाचे नेते, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली.
शेंडगे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध पक्षातील ओबीसी प्रतिनिधींचा मेळावा सांगलीत पार पडला. शेंडगे म्हणाले, मराठा समाजातील सग्या-सोयऱ्यांना आरक्षण द्यावे, यासाठी मराठवाड्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या रॅली, पदयात्रा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ओबीसीमधून आरक्षण मिळविण्यासाठी सरकारवर दबाब आणला जात आहे. मराठा समाजासाठी राज्य शासनाकडून काढण्यात येणारा ‘सगेसोयरे’ अध्यादेश बेकायदेशीर व घटनाबाह्य असेल. मराठा समाज मागास आणि कुणबीही नाहीत.
मुळातच ओबीसी समाज एकत्र आला, तर आरक्षणाला धक्का लागणार नाही. ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. सरकारवर ओबीसीचे नेते दबाव आणत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजास ओबीसीमधून आरक्षण मिळू देणार नाही. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून १६ टक्के आरक्षणालाही आम्ही विरोध केला नाही; परंतु गायकवाड समितीच्या अहवालाला आम्ही विरोध करीत आहोत. सर्वोच्च न्यायालयातही आम्ही याच्याविरोधात जाऊ, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला. यावेळी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संजय मेंढे, आकाराम मासाळ, अरुण खरमाटे, प्रदीप वाले, शशिकांत गायकवाड, राजेंद्र कुंभार, सविता मदने यांच्यासह ओबीसी समाजातील नेते उपस्थित होते.
ओबीसी समाजही उमेदवार उभा करेलशेंडगे म्हणाले, मनोज जरांगे-पाटील विधानसभेला उमेदवार पाडण्याची धमकी देत आहेत. पण आता ओबीसी समाज एक झाला आहे. ते जर उमेदवार उभे करणार असतील तर ओबीसी समाजही उमेदवार उभे करतील.
ऑगस्टमध्ये सांगलीत मेळावाओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सांगलीमध्ये घेण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी ओबीसीचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आ. पंकजा मुंडे, आ. गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर, लक्ष्मण हाके आदींना निमंत्रित करण्यात येणार आहे. या मेळाव्यातून जरांगे-पाटील यांच्या विरोधात प्रतिआंदोलन उभारण्याचा निर्णय होईल, असे शेंडगे यांनी सांगितले.
मेळाव्यासाठी सुकाणू समितीऑगस्टमध्ये होणाऱ्या मेळाव्यासाठी ५१ जणांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. मेळाव्याचे निमंत्रक म्हणून माजी महापौर संगीता खोत, माजी नगरसेवक विष्णू माने, संग्राम माने, सुनील गुरव यांची नियुक्ती करण्यात आली.