सांगली : कुपवाड येथील एका खासगी कोरोना रुग्णालयात तासभर पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक होता. ऑक्सिजन संपण्याच्या भीतीने रुग्णांसह डॉक्टरांचीही गाळण उडाली होती. पण बऱ्याच खटपटीनंतर ऑक्सिजन मिळाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
ऑक्सिजन संपत आल्याने रुग्ण अन्य रुग्णालयात हलविण्याची तयारीही सुरू होती. नगरसेवक अभिजित भोसले यांनी माहिती मिळताच थेट औद्योगिक वसाहतीमधील ऑक्सिजन प्लांटमध्ये धाव घेतली. रुग्णालयाला ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. त्यामुळे ३५ रुग्णांचे प्राण वाचले.
जिल्ह्यातील सर्वच कोविड रुग्णालयांना ऑक्सिजन टंचाईचे संकट भेडसावत आहे. कुपवाडमधील एका कोविड रुग्णालयातदेखील सोमवारी रात्री घालमेल सुरु होती. ऑक्सिजन बेड असले तरी ऑक्सिजनचा मात्र प्रचंड तुटवडा होता.
साठा संपत असल्याचे लक्षात आल्यानंतर रुग्णालयात खळबळ माजली. रुग्णांसह नातेवाईकांचाही जीव टांगणीला लागला. रुग्णांना अन्यत्र नेण्याच्या सूचना नातेवाईकांना देण्यात आल्या. यामुळे गोंधळ सुरू झाला. तोपर्यंत रुग्णवाहिकाही मागविण्यात आल्या.
काहीजणांनी नगरसेवक भोसले यांच्याशी संपर्क साधला. भोसले यांनी धनंजय वाघ, रवी खराडे, जयंत जाधव आदी कार्यकर्त्यांसह अैाद्योगिक वसाहतीमधील ऑक्सिजन प्लांटकडे धाव घेतली. तेथील अधिकाऱ्यांना परिस्थिती सांगितली. ऑक्सिजन देण्याची विनंती केली. अधिकाऱ्यांनी दोन ड्युरा सिलिंडर व २५ जम्बो सिलिंडर तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचले.