सांगली : चालू गळीत हंगामात चौदा दिवसात एफआरपीची रक्कम न दिल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर कारवाईची शक्यता आहे. साखर आयुक्त कार्यालयाने फेब्रुवारी महिन्यात कारवाईची नोटीस बजाविली होती. त्यानंतर कारखान्यांनी रक्कम जमा केली होती. त्यात रक्कम जमा न केलेल्या माणगंगा साखर कारखान्याला आता नोटीस बजाविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली नसल्याने साखर आयुक्तालयाने फेब्रुवारी महिन्यात पाच साखर कारखान्यांवर कारवाईची नोटीस बजाविली होती. जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांच्या माध्यमातून यावर कार्यवाही केली होती. त्यानंतर लगेचच तीन साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम खात्यावर जमा केली, तर उर्वरित कारखान्यांनीही नंतर रक्कम जमा केल्याने कारवाई टळली होती.
त्यानंतर उर्वरित कारखान्यांना थकीत एफआरपी देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी साखर आयुक्त कार्यालयाने माणगंगा साखर कारखान्याला थकीत रक्कम भरण्याविषयी नोटीस दिली आहे. याचा मेल गुरुवारी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर अभिप्राय दिल्यानंतर तहसीलदारांमार्फत ही नोटीस जारी करणार आहे.