सांगली : तिसंगी (ता. कवठेमहांकाळ) येथे रामचंद्र कोरे या तलाठ्याला सहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. मंगळवारी दुपारी बारा वाजता कवठेमहांकाळमध्ये ही कारवाई झाली.
तिसंगी येथील एका शेतकऱ्याने शेतजमिनीचे बक्षिसपत्र करुन दिले होते. त्याची नोंद घालण्यासाठी तलाठी कोरे यांच्याकडे प्रस्ताव दिला होता, पण त्यासाठी कोरे यांनी पैशांची मागणी केली. पैसे न मिळाल्याने नोंदही प्रलंबित ठेवली. कंटाळलेल्या शेतकऱ्यांने सांगलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा लावण्यात आला.
कोरे याने मंगळवारी सकाळी पैसे घेऊन कवठेमहांकाळमध्ये शेतकऱ्याला बोलविले. तेथे पैसे घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. कोरे हा जत तालुक्यातील रहिवासी असून त्याच्याविरोधात यापूर्वीदेखील तक्रारी झाल्या होत्या. या महिन्यात त्याची बदलीदेखील होणार होती, तत्पूर्वीच तो लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला. मंगळवारी दिवसभर जाबजबाब आणि पंचनामा सुरु होता.