सांगली - मी मुख्यमंत्री असताना बिरोबा देवस्थानासाठी ५ कोटी मंजूर केले होते. यापैकी काही काम झालं. आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितंलं की १६५ कोटींचा विकास आराखडा तयार आहे. तो राज्य सरकारनेच केंद्राकडे पाठवायचा असतो. आम्ही विकासाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठल्यावर केंद्राची मदत व निधी आणू. आरेवाडीच्या विकासासाठी केंद्राकडून निधी आणणार असं आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्री बिरोबा महाराष्ट्रातील तमाम बहुजन धनगर व सर्वच समाजाचे आराध्य दैवत आहेत. कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश अशा अनेक राज्यातून लोक इथं दर्शनासाठी लोक येतात त्यामुळं राष्ट्रीय ख्यातीच्या या मंदिरासाठी केंद्र मदतीला सकारात्मकता दाखवेल. आपण बिरोबाच्या नावानं चांगभलं म्हणतो म्हणजे सर्वांचं भलं होईल. चांगभलं म्हणजे बहुजन समाजाचं पसायदन आहे. सर्वांचं भलं होण्यासाठी मी श्री भगवान बिरोबाकडे साकडं घातलं आहे असं त्यांनी सांगितले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतील आरेवाडी येथील श्री बिरोबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री बिरोबाचे दर्शन घेतले. देवस्थान कमिटीने व समाजातील मंडळीने देवेंद्र फडणवीस यांचे धनगरी ढोलाच्या गजरात स्वागत गेले. घोंगडी, घुंगराची काठी व मानाचा फेटा यावेळी देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुधीर गाडगीळ आदी उपस्थित होते.