अविनाश कोळीसांगली : प्रसंगी कठोर भूमिका घेऊन राज्यातील पूरपट्ट्यातील अतिक्रमणे हटविणारच, अशी भीमप्रतिज्ञा मुख्यमंत्र्यांनी सांगली व कोल्हापूर दाैऱ्यात केली होती. ती आता हवेत विरली आहे. वडनेरे समितीने दिलेल्या अहवालाचेही गाठोडे बांधण्यात आल्याने सांगली शहरात आपत्ती व्यवस्थापनाची औपचारिकता पार पाडली जात आहे. एकीकडे आपत्ती व्यवस्थापन सुरू असताना दुसरीकडे नदीपात्रालगतच बांधकामे व भराव टाकण्याचे काम सुरू झाले आहे.सांगली जिल्ह्यात महापुराचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाऊण लाख घरांत शिरलेले पाणी, ४० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान ही आकडेवारी धडकी भरविणारी आहे. महापूर आल्यानंतर प्रत्येकवेळी मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांचे दौरे होतात. पण, प्रत्यक्षात ठोस उपाययोजना केली जात नाहीत.वडनेरे समितीने मे २०२० मध्ये त्यांचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. त्याची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट संकेत ठाकरे यांनी दिले होते. याशिवाय सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपाहणी दौऱ्यात त्यांनी अतिक्रमणांवर कारवाईची भीमप्रतिज्ञाही बोलून दाखविली होती. त्यांच्या दौऱ्यास आता वर्षे उलटले तरीही राज्यातील पूरपट्ट्यात एकाही अतिक्रमणास हात लावला नाही. याउलट वर्षभरात आणखी शेकडो बांधकामे पूरपट्ट्यात निर्माण झाली.सांगली शहरातील ओत आता पूर्णपणे भरले आहेत. वर्षभरात ही अतिक्रमणे वाढली. याबाबत ना जिल्हा प्रशासनाने काही कारवाई केली ना महापालिकेने. दोन्ही प्रशासनाने हाताची घडी घालत या बांधकामांकडे पाहण्याशिवाय काही केले नाही.
एकीकडे आपत्ती व्यवस्थापन, दुसरीकडे भरावएकीकडे महापालिका, जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक करीत असताना दुसरीकडे नदीपात्रालगत, ओतात, पूरपट्ट्यात भराव टाकण्याचे काम अजूनही सुरु आहे. केवळ पावसाळ्यात ते थांबण्याची शक्यता आहे.वडनेरे समितीच्या शिफारसींवर नजर
- अतिक्रमणाविरुद्ध ठोस धोरण राबविणे
- निषिद्ध, प्रतिबंधित क्षेत्रातील अतिक्रमणे प्राधान्याने हटविण्यासाठी फ्लड प्लॅन व झोनिंग नियम कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी लागू करणे.
- एककालिक पूर पूर्वानुमान पद्धतीचा महाराष्ट्रासह संपूर्ण कृष्णा खोऱ्यात अवलंब करणे.
- नदीपात्र पुनर्स्थापित करणे.
- नदीपात्रातील काही अतितीव्र वळणे सरळ करणे
- पूररेषा सुधारित करणे
- पूरनिवारणासाठी सुयोग्य जागेत साठवण तलाव निर्माण करणे.
सांगलीतील २०२१ मधील नुकसान
- पुराचा फटका बसलेली घरे ७३,९९७
- बाधित शेती ४० हजार हेक्टर
- पूरबाधित शेतकरी १ लाख ५६५
- मृत जनावरे १२१