सांगली : दोन दिवसांच्या वीकेंड लाॅकडाऊननंतर सोमवारी शहरातील सर्वच बाजारपेठांत नागरिकांनी खरेदीसाठी तोबा गर्दी केली होती. त्यात संभाव्य लाॅकडाऊनच्या भीतीने नागरिकांनी भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात रांगा लावल्या होत्या. जमावबंदी, कोरोना नियमांची पायमल्ली होत असताना प्रशासन मात्र नागरिकांच्या वर्तनापुढे हतबल झाल्याचे दिसून आले.
राज्य शासनाने शनिवार व रविवार या दोन दिवसांसाठी वीकेंड लाॅकडाऊन जाहीर केला होता. या लाॅकडाऊनला शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. दोन दिवस शहरातील सर्वच बाजारपेठा, दुकाने पूर्णत: बंद होती. रस्त्यावर वर्दळही फारशी नव्हती. त्यात कडक लाॅकडाऊन लागू करण्याची शासनाकडून सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत कडक लाॅकडाऊन होणार असल्याच्या भीतीने सोमवारी शहरातील रस्त्यावर नागरिक मोठ्या संख्येने उतरले होते.
शहरातील हरभट रोड, मारुती रोड, कापडपेठ या परिसरात किरकोळ खरेदीसाठी सकाळी दहा वाजल्यापासून गर्दी झाली होती. गणपती पेठेत किराणा मालाच्या खरेदीसाठी गर्दी होती. त्यामुळे काहीकाळ या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. शिवाजी मंडईत भाजीपाला खरेदीसाठी महिलांची गर्दी होती. अगदी काॅस्मेटिक दुकानांतही रांगा लागल्या होत्या. किराणा, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला मिनी लाॅकडाऊनमध्ये परवानगी दिली असली तरी बाजारपेठेतील बहुतांश दुकाने सुरू होती. अनेकांनी अर्धे शटर उघडून व्यवसाय सुरू केला होता. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मोबाइल दुकानात तरुणांनी गर्दी केली होती. यावेळी कुठेच जमावबंदीच्या आदेशाचे पालन होताना दिसत नव्हते. दुकानासमोर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नव्हते. अनेकांनी तोंडाला मास्कही लावलेला नव्हता. कोरोना नियमांची पायमल्ली करीत नागरिकांकडून खरेदी सुरू होती.
चौकट
मार्केट यार्ड, माॅल्स हाऊसफुल्ल
लाॅकडाऊनच्या भीतीने नागरिकांनी वसंतदादा मार्केट यार्डात सकाळपासून जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. अनेक दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. दिवसभर दुकानात गर्दी होती. तीच स्थिती शहरातील माॅल्समध्येही होती. डिमार्ट, दांडेकरसह अनेक माॅल्समध्ये मोठी गर्दी झाली होती. काही माॅल्सनी तर ग्राहकांची गर्दी पाहून थोड्या काळासाठी प्रवेश बंदही केला होता.
चौकट
प्रशासन हतबल
बाजारपेठ, मार्केट यार्ड, माॅल्समध्ये सोमवारी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीच यंत्रणा कार्यरत नव्हती. काही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता; पण तोही अपुरा होता. दुपारनंतर महापालिका व शहर पोलिसांनी एकत्र येत गर्दी कमी करण्यासाठी दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला.