मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) येथे शनिवारपासून दोन दिवस कडकडीत बंद पाळला जाणार आहे. किराणा दुकान, भाजीपाला, पानपट्टी यास अन्य दुकाने बंद करण्यात आली असून, फक्त रुग्णालये, औषध दुकाने व दूध संकलन केंद्रे सुरू आहेत.
गावात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीने हा निर्णय घेतला.
आरवडेमध्ये महिन्याभरापासून कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शुक्रवारी गावात १० कोरोनाबाधित सापडल्याने खळबळ उडाली. जुलैत आजअखेर ६० पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. बंदीच्या कालावधीत गावात पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. दोन दिवसांत कोणीही घराबाहेर पडू नये, तसेच विनामास्क आढळल्यास किंवा गाव बंदच्या कालावधीत छुप्या पद्धतीने दुकाने उघडी दिसल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे व त्यामध्ये पुढे दहा दिवस बंद वाढविण्यासाठी निर्णय होईल, असे उपसरपंच पंढरीनाथ वाघ यांनी सांगितले.