सांगली : मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने राज्यभर मोर्चे काढूनही सरकारचे मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाभर ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्ग व राष्ट्रीय व राज्यमार्गावर हे आंदोलन करण्यात येणार असून, आंदोलन पूर्णपणे शांततेने पार पाडण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आचारसंहिता प्रसिध्द करण्यात आली आहे.मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने विविध मागण्यांसाठी राज्यभर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चानंतरही सरकारकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी राज्यभर ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची आठवडाभरापासून जोरात तयारी सुरू आहे. मंगळवारचे आंदोलन पूर्णपणे शांततेच्या मार्गाने होण्यास प्राधान्य देण्यात येणार असून, त्यासाठीची आचारसंहिताही प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्व जिल्हा सीमा, प्रमुख मार्ग, राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गावरही ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनास सकाळी अकरा वाजता सुरुवात होणार असून दुपारी एक वाजता आंदोलनाची सांगता होणार आहे. सांगली शहरात अंकली फाटा, लक्ष्मी फाटा, साखर कारखाना, वसंतदादा (भारत) सूतगिरणी आदी प्रमुख ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ‘चक्का जाम’ आंदोलन यशस्वी करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जिल्हाभरात आज ‘चक्का जाम’
By admin | Published: January 30, 2017 11:36 PM