अतुल जाधव ।देवराष्ट्रे : कुंभार समाज नवीन तंत्रज्ञानाच्या युगात उपेक्षितांचे जीवन जगत आहे. चिनी वस्तूंनी बाजारपेठांवर कब्जा केल्यामुळे मातीपासून तयार होणाऱ्या वस्तूंना आता बाजारात दर आणि मागणीही नाही. वंशपरंपरागत कुंभार समाजाच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.कुंभार समाज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र वाढत्या महागाईत कसे तग धरून रहायचे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे काहींनी पारंपरिक व्यवसायाला बगल देत उदरनिर्वाहाचे नवीन मार्ग शोधले आहेत.
हल्ली कुंभार समाजाला विविध भांडी तयार करण्यासाठी मातीपासून ते इंधनापर्यंत सर्वच विकत आणावे लागते. व्यवसायासाठी लागणारा खर्च व यातून मिळणारे उत्पन्न फार कमी असल्याने या व्यवसायाकडे तरुणांनी पाठ फिरविली आहे. कुंभार समाज मातीपासून दिवे, घागरी, माथन, गल्ले, उदानी, कुंडल्या, कुंडी माठ, पारोली, सुरई, मूर्ती अशा वेगवेगळ्या वस्तू बनवून दारोदारी भटकंती करून व आठवडा बाजारात या वस्तूंची विक्री करून मिळणाऱ्या तुंटपुज्या उत्पन्नात उदरनिर्वाह करीत आहे.
शासनाकडून मदत?कुंभार समाज ओबीसी समाजात मोडतो. या समाजाला नवीन तंत्रज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची गरज आहे. मातीचे भांडे बनविण्यासाठी इलेक्ट्रिक साहित्याचे मोफत वाटप केले पाहिजे. शासनाने व्यवसायासाठी लागणाऱ्या मातीवरील कर हटविला पाहिजे, तरच ही कला टिकेल व वाढीस लागेल.
हा पारंपरिक व्यवसाय टिकावा यासाठी शासनाने अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पण ही तरतूद कागदावरच आहे. बँका कर्ज देत नाहीत, परदेशी वस्तूंबरोबर स्पर्धा करण्यासाठी आधुनिक प्रशिक्षण केंद्रे उभारली पाहिजेत, तरच ही कला टिकेल व वाढेल.- नंदकुमार कुंभार, जिल्हाध्यक्ष, कुंभार समाज