सांगली : ३० ते ४४ वर्षे वयोगटासाठी कोरोना लसीकरण शनिवारपासून (दि. १९) सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रात लस दिली जाणार आहे. यासंदर्भातील निर्णय शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये झाला.
लसीच्या तुटवड्यामुळे सुमारे महिन्याभरापासून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद होते. ते अंशत: सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सांगली जिल्ह्यात काही मोजक्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरण सुरू होणार आहे. पुरेशी लस आल्यानंतर तरुणांना लस मिळेल.
दरम्यान, गुरुवारी रात्री कोव्हिशिल्डचे नऊ हजार डोस आले होते. त्यातील दीड हजार डोस महापालिकेला देण्यात आले. त्यातून ९०० जणांचे लसीकरण शुक्रवारी दिवसभरात झाले. सध्या ६०० डोस शिल्लक आहेत. त्यातून उद्या लसीकरण सुरू राहील. ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना पहिला व दुसरा डोस मिळेल, शिवाय उपलब्धतेनुसार ३० ते ४४ वयोगटालाही लस दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे नोडल अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली.
सध्या पोर्टलवरील नोंदणी किंवा आरक्षण बंद आहे. लाभार्थ्यांना प्रत्यक्ष केंद्रावर आधार कार्ड घेऊन जावे लागेल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वानुसार लस दिली जाणार आहे. लस संपल्यास लाभार्थ्याची नोंदणी करून ठेवली जाणार आहे. लस येताच बोलावून घेतले जाईल.