सांगली : हिवरे (ता. खानापूर) येथील तीन महिलांच्या खूनप्रकरणी नायब तहसीलदार एस. डी. पाटील याचा फेरतपास घेण्यावरुन विशेष सरकारी वकील उज्वल निकम व बचाव पक्षाचे वकील प्रमोद सुतार यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. साक्षीदाराचा पुन्हा फेरतपास घेणे म्हणजे संशयित आरोपीच्या नैसर्गिक न्याय हक्कावर गदा येऊन शकते, ही बाब अॅड. सुतार यांनी मांडली. न्यायालयाने यावर मंगळवारी, ५ रोजी निर्णय देणार असल्याचे जाहीर केले.
हिवरेत तीन वर्षापूर्वी शिंदे वस्तीवर सुनीता पाटील, निशिगंधा शिंदे व प्रभावती शिंदे या तीन महिलांचा चाकूने हल्ला करुन निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. संशयितांपैकी दोघे जिल्हा कारागृहात असून अल्पवयीन संशयित जामिनावर बाहेर आहे. तिहेरी हत्याकांडाच्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.सहा महिन्यांपूर्वी या तिहेरी खून-खटल्याच्या सुनावणीस प्रारंभ झाला आहे.
या खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम, तर बचाव पक्षातर्फे अॅड. प्रमोद सुतार काम पाहत आहेत. खटल्यात पंच, फिर्यादी, साक्षीदार यांच्यासह चौदावर्षीय मुलाचीही साक्ष नोंदविण्यात आली आहे. महिन्यापूर्वी झालेल्या सुनावणीत नायब तहसीलदार एस. डी. पाटील यांची साक्ष नोंदवून घेण्यात आली होती. संशयित आरोपींची ओळखपरेड घेतल्याने त्यांची साक्ष महत्त्वाची होती. अॅड. सुतार यांनी एस. डी. पाटील यांचा उलटतपास घेतला होता. यावेळी त्यांच्या अनेक प्रश्नांवर पाटील निरूत्तर राहिले होते. सुतार यांनी जोरदार युक्तिवाद करीत खटल्यातील काही महत्त्वपूर्ण बाबींकडे न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले होते.
अॅड. निकम यांना आक्षेप घेत पाटील यांची फेरतपासणी घेण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्यावर सोमवारी जिल्हा सत्रन्यायाधीश डी. पी. सातवलेकर यांच्यासमोर दोन्ही पक्षाने युक्तिवाद सादर केला. अॅड. निकम यांनी, नायब तहसीलदार पाटील यांना सात प्रश्न विचारणार आहे, यातून स्पष्टता होऊन खटल्याचा अंतिम निकाल देण्यास मदत होईल, असे युक्तिवादात सांगितले. यावर अॅड. सुतार यांनी आक्षेप घेत, पाटील यांना पुन्हा प्रश्न विचारणे गैर आहे, तसे केल्यास आरोपींच्या नैसर्गिक न्यायाच्या हक्कावर गदा येऊ शकते. तसेच उलटतपासणी घेण्याच्या बाबीला काहीच अर्थ राहणार नाही, असे युक्तिवादात सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून, मंगळवार दि. ५ रोजी, पाटील यांचा फेरतपास घ्यायचा का नाही, याबद्दल निर्णय दिला जाईल, असे जाहीर केले.
सध्या या खटल्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या खटल्याचा निकाल लवकरच अपेक्षित आहे. हा निकाल नेमका काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अनिकेत कोथळे : आज सुनावणीसांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह सहा संशयितांविरुद्ध सोमवारी आरोप निश्चित केले जाणार होते, पण ही सुनावणी होऊ शकली नाही. आज मंगळवार, दि. ५ फेब्रुवारीला आरोप निश्चित करण्यात येणार आहेत. यावेळी कामटेसह सर्व संशयितांना न्यायालयात आणले जाणार आहे.