वाळवा : आजची लोकशाही ही गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची नसून, भांडवलदार अदानी व अंबानींची आहे. त्यात बदल करायचा असेल तर, डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णांच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केले. क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांची ९३ वी जयंती व ग्रंथ प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर जलबिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह राणा, निमंत्रक वैभव नायकवडी, मोहनराव कदम, रामभाऊ लाड, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, कुसुमताई नायकवडी, अॅड. सुभाष पाटील, विशाखाताई खैरे, माजी आमदार संपतराव पाटील-पवार, विश्वासराव पाटील, प्रा. डॉ. बाबूराव गुरव, कारखान्याच्या उपाध्यक्षा वंदना माने, दूध संघाचे अध्यक्ष भगवान पाटील व ग्रंथलेखक जयवंत अहिर उपस्थित होते.भाई वैद्य म्हणाले की, वाळव्याच्या प्रत्येक कणात क्रांती ठासून भरली आहे. स्वातंत्र्य मिळविणे सोपे होते, परंतु तेच स्वातंत्र्य गरिबांच्या झोपडीपर्यंत नेणे कठीण बनले आहे. स्वातंत्र्याची किरणे झोपडीतील प्रत्येकाला मिळाली पाहिजेत, ही प्रेरणा नागनाथअण्णांची होती. आज शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन भांडवलदारांच्या घशात घालायचा एक उद्योग बनला आहे. आज देशात आतापर्यंत सव्वातीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुसऱ्या देशातील नुसत्या ३२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असत्या, तर तेथील जनतेने त्या शासनाला डच्चू दिला असता. अण्णांनी हुतात्मा साखर कारखाना हा आपला किंवा आपल्या कुटुंबाचा म्हणून उभारला नसून, तो शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांसाठी उभारला. व्यक्ती आणि समाजाचा विकास शिक्षणाने होतो, यासाठी त्यांनी दऱ्या खोऱ्यातून शाळा काढल्या. जलबिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, देशातील दोनतृतीयांश छोट्या नद्या आज मृत झाल्या आहेत. त्या शेती फुलविण्यासाठी जिवंत केल्या पाहिजेत. पाणी प्रदूषण थांबविले पाहिजे. पाणी प्रदूषित करणाऱ्यांना तुरुंगात डांबले पाहिजे. त्यासाठी आता या क्रांतिकारी भागातील, अण्णांच्या भागातील लोकांनी शेतकऱ्यांची जमीन वाचविण्यासाठी व ती फुलविण्यास पाणी मिळविण्यासाठी शिवाय रोगराई नष्ट करण्यासाठी तीव्र लढा दिला पाहिजे. त्याचे नेतृत्व वैभव नायकवडी यांनी करावे, असे ते म्हणाले.प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या घामावर देश चालला आहे. तोच शेतकरी आज आत्महत्या करतो आहे. हेच काय ते अच्छे दिन आहेत. पाण्याचे खासगीकरण करण्याचे पाप ब्रिटिशांनीसुद्धा केले नव्हते. ते प्रयत्न सरकारने केलेले आहेत. यावेळी कुसुमताई नायकवडी यांनी अण्णांचा जीवनपट मांडला. वैभव नायकवडी व हुतात्मा कारखान्याच्या उपाध्यक्षा वंदना माने यांनी मान्यवरांचा सत्कार केला. क्रांतिगीते सादर करण्यात आली. सकाळी ६.३० वाजता क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांच्या समाधीस्थळी मान्यवरांनी अभिवादन केले. हुतात्मा बँकेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. बँकेच्या एटीएम सेवेचा प्रारंभ करण्यात आला. गावातून अण्णांच्या प्रतिमेची विद्यार्थ्यांनी घोषणा देत फेरी काढली. दुपारच्या सभेत ‘नागनाथअण्णांचे स्वातंत्र्यानंतरचे कार्य’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. राजा माळगी व प्रा. आर. एम. मुल्ला यांनी केले. प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी आभार मानले. सभेला सरपंच गौरव नायकवडी, उपसरपंच अपर्णा साळुंखे, प्राचार्य विश्वास सायनाकर, प्राचार्या सुषमा नायकवडी, सावकर कदम, नरेंद्र कापडणीस, संजय खोत, अशोक माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)योजनेचे पाणी मिळेल, असे वाटत नाही!राजेंद्रसिंह राणा म्हणाले की, टेंभू योजनेचे पाणी सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील १३ दुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळाले पाहिजे, हे क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी सतत २२ वर्षे संघर्ष केला. परंतु सध्याची एकूण परिस्थिती पाहिली तर, हे पाणी मिळेल असे अजूनही वाटत नाही. त्यामुळे नागनाथअण्णांसारखी भूमिका घेणे आवश्यक आहे.
आजची लोकशाही भांडवलदारांचीच
By admin | Published: July 16, 2015 12:16 AM