सांगली : जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील पाणीटंचाईची परिस्थिती मिटण्यासाठी आवश्यक असणारे म्हैसाळ योजनेतून तातडीने पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवार, दि. ९ फेब्रुवारीला सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत, आमदार गणपतराव देशमुख, मानसिंग उद्योग समूहाचे नेते जे. के. बापू जाधव आदी करणार आहेत. या आंदोलनात शिवस्वराज्य, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मिरज पूर्व भागातील कॉँग्रेसचे पदाधिकारी, भारतीय विद्यार्थी संसद, मातंग सेवा संघ, मागासवर्गीय संघर्ष समिती, जिजाऊ ब्रिगेड, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, डॉ. विठ्ठलराव पाटील कृषी परिषद, शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नाभिक महामंडळ, वकील संघटना आदी संघटना यात सहभागी होणार आहेत. म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी संविधान मोर्चाची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या पुढाकाराने २९ जानेवारीला म्हैसाळ पंपगृहावर मोर्चा काढण्यात आला होता. मंगळवार, दि. २ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दररोज एका संघटनेच्यावतीने साखळी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनास जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने, उद्या, मंगळवारी होणारा मोर्चा विराट स्वरुपाचा होणार असल्याचा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला. या आंदोलनात संविधान मोर्चाचे संयोजक चंद्रशेखर पाटील, दीपक पाटील, संजय देसाई, अॅड. के. डी. शिंदे, अॅड. अजितराव सूर्यवंशी, माजी सभापती अनिल आमटवणे, प्रा. सिध्दार्थ जाधव, खंडेराव जगताप, बाजार समितीचे संचालक वसंतराव गायकवाड, तानाजीराव पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत आदी सहभागी होणार आहेत. यात सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार, चंद्रकांत पाटील, सुभाष माने, प्रतापसिंह मोहिते-पाटील, फत्तेसिंग राजेमाने, सूर्यकांत पाटील आदी सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी) मोटारसायकल रॅलीचे आयोजन बेडग येथील शेतकरी मोटारसायकल रॅलीसह या मोर्चात सहभागी होणार आहेत. मंगळवारी होणारे आंदोलन हे पूर्णपणे राजकारणविरहित असल्याने, अनेक संघटना यात सहभागी होणार आहेत. पाच हजाराहून अधिक शेतकरी या मोर्चात सहभागी होतील, असा विश्वास मोर्चाच्या संयोजकांनी व्यक्त केला.
‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी आज मोर्चा
By admin | Published: February 08, 2016 11:18 PM