सातारा : धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी दहिवडी येथे गुरुवार, दि. १६ रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणाऱ्या मल्हार क्रांती मोर्चाला मराठा समाजापाठोपाठ इंदूर मधील श्री क्षत्रिय धनगर सेवा संघ इंदूर यांनी पाठिंबा दिला आहे. राजे मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या भूमीतून मोर्चाला पाठिंबा मिळाल्याने माण-खटाव मधील सकल धनगर समाजाचा उत्साह आणखीन वाढला आहे. सुमारे अडीच वर्षांपूर्वी बारामती येथील उपोषणादरम्यान तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर पंधरा दिवसांत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत येऊन अडीच वर्षे झाली तरी त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने धनगर समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाला वाट करून देण्यासाठी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या आश्वासनाचे स्मरण करून देण्यासाठी माण-खटाव मधील सकल धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर मल्हार क्रांतीच्या झेंड्याखाली एकवटत आहे. मल्हार क्रांतीच्या माध्यमातून काढण्यात येणाऱ्या दि. १६ रोजीच्या मोर्चास समाजातील सर्वच स्तरांतून मोठा पाठिंबा मिळत आहे. कर्नाटक, तमिळनाडू तसेच नोकरीसाठी परदेशात स्थायिक असलेले रत्नागिरी व इतर जिल्ह्यांतील युवकांनी सुद्धा पाठिंबा जाहीर करत त्यासाठीचे लाईव्ह व्हिडिओ फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. गावभेटी, बैठका आणि प्रबोधनाच्या माध्यमातून धनगर समाजाचे संघटन सुरू असल्याने त्याची चर्चा संपूर्ण राज्यात तसेच परराज्यात सुद्धा होऊ लागली आहे. याच अनुषंगाने श्री क्षत्रिय धनगर सेवा संघ, इंदूर यांनी लेखीपत्राद्वारे मल्हार क्रांती मोर्चास आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतचे पत्र सेवा संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र बारगळ यांनी मल्हार क्रांती मोर्चाच्या संयोजकांकडे सोपवले आहे. मल्हार क्रांतीला राजे मल्हारराव होळकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भूमीतून पाठिंबा मिळाल्याने माण-खटाव मधील सकल धनगर समाजाचा उत्साह वाढला आहे. (प्रतिनिधी)
आज मल्हार क्रांती मोर्चा
By admin | Published: March 15, 2017 10:50 PM