कवठेमहांकाळ : हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे ‘आम्ही हिंगणगावकर’ परिवारातर्फे पहिले लोकजागर साहित्य संमेलन शनिवार दि. १४ रोजी आयोजित करण्यात आले आहे. माजी जिल्हाधिकारी व साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत, तर शीला सगरे उद्घाटक आहेत. महादेव माळी व निमंत्रक प्रा. अनिलकुमार पाटील स्वागताध्यक्ष आहेत. हे संमेलन ग्रामपंचायत हिंगणगावच्या प्रांगणात होणार असून या परिसराला ‘विठ्ठल कामण्णा कोळेकर साहित्यनगरी’ असे नाव देण्यात आले आहे.शनिवारी सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. पांडुरंग इरळे ग्रंथ दालनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष देशमुख यांच्याहस्ते होणार आहे. सकाळी दहा वाजता संमेलनाला सुरुवात होणार आहे. कादंबरीकार मोहन पाटील, कवी रघुराज मेटकरी, कथाकथनकार जयवंत आवटे, मधुकर खरे, आप्पासाहेब पाटील आदी साहित्यिक मंडळी या संमेलनाला उपस्थिती लावणार आहेत.साडेअकरा वाजता नाटककार बी. के. पाटील साहित्यनगरीत ‘नाटक, काल, आज आणि उद्या’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन, नाट्यदिग्दर्शक डॉ. दयानंद नाईक, प्रा. डॉ. बी. डी. पाटील, प्रा. अनिलकुमार पाटील सहभागी होणार आहेत. या ग्रामीण भागातील संमेलनाला साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. (वार्ताहर)
हिंगणगावमध्ये आज साहित्य संमेलन
By admin | Published: November 13, 2015 11:50 PM