सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीत वर्णी लागावी, यासाठी सर्वच राजकीय पक्षांत खलबते सुरू आहेत. इच्छुकांनी नेत्यांना साकडे घातले आहे. आता नेतेमंडळी काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. प्रतिस्पर्धी इच्छुकांचे पंख छाटण्याचीही व्यूहरचना आखली जात आहे. गेल्या तीन वर्षात कोणतेच पद पदरात न पडलेल्या इच्छुकांनी, आता नाही तर कधीच नाही म्हणत, स्थायी समितीत जाण्यासाठी कंबर कसली आहे. त्यात नेत्यांच्या मर्जीतील इच्छुकांनी आपलीच वर्णी लागणार, असा दावा केल्याने इतर सदस्यांत नाराजीचा सूर उमटत आहे. महापालिकेच्या अर्थपूर्ण व्यवहाराची जबाबदारी असलेल्या स्थायी समितीत जाण्यासाठी यंदा नगरसेवकांची मोठी रांग लागली आहे. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीतून आठ नवे सदस्य स्थायी समितीत जातील. १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महासभेत त्याचा फैसला होणार आहे. त्या त्या पक्षाचे गटनेते बंद लिफाफ्यातून सदस्यांची नावे महापौर हारूण शिकलगार यांच्याकडे देणार आहेत. या बंद लिफाफ्यात आपलेच नाव असावे, यासाठी इच्छुकांची धडपड सुरू झाली आहे. काँग्रेसमधून तीन सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. विद्यमान सदस्य दिलीप पाटील, शिवाजी दुर्वे यांनीही सदस्यपदासह सभापती पदावरही दावा केला आहे. गुंठेवारी समितीच्या सभापती शालन चव्हाण, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, अतहर नायकवडी, निरंजन नायकवडी, बबीता मेंढे, गटनेते किशोर जामदार, किशोर लाटणे अशी लांबच लांब यादी आहे. काँग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम यांनी दोन दिवसांपूर्वी सदस्य निवडीबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. नव्या सदस्यांना स्थायी समितीत संधी दिली जाईल, असे जाहीर केल्याने दिग्गज नगरसेवकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात नगरसेविका प्रियंका बंडगर, अंजना कुंडले, संगीता हारगे, प्रार्थना मदभावीकर या चार जणांना गेल्या तीन वर्षात कोणत्याच पदाची संधी मिळालेली नाही. उर्वरित नगरसेवकांना स्थायी समिती, प्रभाग सभापती अशा विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या चार नगरसेवकांची प्रबळ दावेदारी आहे. त्यापैकी किमान दोन जणींना संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्वाभिमानी आघाडीतही सारेच आलबेल राहिलेले नाही. गटनेते शिवराज बोळाज हेच इच्छुक असल्याने इतर सदस्यांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. गेली तीन वर्षे गटनेतेपद असताना, पुन्हा स्थायी समितीत कशाला संधी हवी, असा सवाल केला जात आहे. पण स्वाभिमानीच्या नेत्यांची मर्जी बोळाज यांच्यावर असल्याने त्यांनाच संधी मिळेल, अशी शक्यता दिसते. बाळासाहेब गोंधळी, अश्विनी खंडागळे हेही इच्छुक आहेत. सहयोगी सदस्या सुनीता पाटील यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभिमानीत अंतर्गत संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)जयश्रीतार्इंचा निर्णय : सर्वांसाठी अंतिमकाँग्रेसच्या तीन सदस्य निवडीचे अधिकार जयश्रीताई पाटील व आमदार पतंगराव कदम यांच्याकडे असले तरी अंतिम निर्णय मात्र जयश्रीताई पाटील याच घेणार आहेत. गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी काँग्रेसला उपमहापौर गटाची मोठी डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे स्थायीत उपमहापौर गटातील कोणालाही संधी मिळणार नाही, हे उघड आहे. बुधवारी जयश्रीताई काँग्रेस पदाधिकारी व प्रमुख नगरसेवकांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर त्या गटनेते किशोर जामदार यांच्याकडे तीन सदस्यांची नावे देतील, असे काँग्रेस सूत्रांकडून सांगण्यात आले.
‘स्थायी’च्या निवडीवरून नाराजीचा सूर
By admin | Published: August 29, 2016 10:47 PM