इस्लामपूर : शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी ते पैसे माहेरहून घेऊन ये, अशी मागणी करत सासरच्या लोकांनी शिवीगाळ आणि मारहाण करत आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची फिर्याद विवाहितेने दिली आहे. सासरच्या लोकांनी छळ करत ८ लाख रुपयांची रक्कमसुद्धा उकळल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेत प्राध्यापक असणाऱ्या कोल्हापुरातील पतीसह त्याचे आई-वडील आणि मामाविरुद्ध महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अनुराधा अभिजित भोसले (३४, मूळ रा. नागाळा पार्क, विशाळगडकर कॉलनी, कोल्हापूर) या विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्राध्यापक पती अभिजित अशोक भोसले (३८), सासू आरती अशोक भोसले (६८), सासरा अशोक शंकर भोसले (७०, तिघे रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) आणि मामा राजेंद्र दळवी (६२, मंगळवार पेठ, कोल्हापूर), अशा चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.अनुराधा आणि अभिजित यांचा जुलै २०१८ मध्ये विवाह झाला. त्यानंतर वर्षभराने या कुटुंबाने पैशाची मागणी करत अनुराधा यांचा छळ करण्यास सुरुवात केली. शेअर बाजारात गुंतवण्यासाठी पैसे घेऊन ये, माहेरकडील हिस्सा विकून पैसे आण, असा तगादा या सासरच्या लोकांनी लावला होता. शेवटी तुला मूल होत नाही, असे कारण पुढे करत तिला मारहाण करण्यात येत होती. सासरच्या या छळाला कंटाळून ही महिला सात महिन्यांपूर्वी माहेरी इस्लामपूर येथे आली आहे. समेटाचे प्रयत्न करूनही या लोकांनी दाद न दिल्याने शेवटी तिने पोलिसांत धाव घेतली. हवालदार विकास थोरबोले अधिक तपास करीत आहेत.
शेअर बाजारात गुंतवण्यासाठी पैसे मागत विवाहितेचा छळ, कोल्हापुरातील प्राध्यापक पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:30 PM