लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पंचशीलनगर येथील रेल्वे गेटवर रविवारी सायंकाळी एका ट्रॅक्टरचालकाने लाल दिवा लागल्यानंतरही वाहन रेटण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टरच्या धडकेत रेल्वेचे उत्तरेकडील गेट मोडले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची धावाधाव झाली. रात्री उशिरा संबंधित ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरू होत्या.सांगलीतील पंचशीलनगर रेल्वे गेटवर सतत समस्या निर्माण होत आहेत. वाहतूक कोंडीचा तोडगा अद्याप निघाला नाही. अप्पर पोलिस अधीक्षकांनी शनिवारीच पाहणी करून वाहतूक नियोजनाबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर रविवारी वाहतूक पोलिसांनी दिवसभर याठिकाणी थांबून नियोजन केले. मात्र, सायंकाळी ऊस वाहतूक करून करणाऱ्या ट्रॅक्टरने याठिकाणी शिरकाव केला. ट्रॅक्टरच्या चारही बाजूंनी उंच काठ्या बांधण्यात आल्या होत्या. ट्रॅक्टर गेटच्या दिशेने येत असतानाच लाल दिवा लागला. अनेक वाहनांची गेटखालून जाण्याची धडपड सुरू झाली. त्याचवेळी ट्रॅक्टरचालकानेही घाई केली. गेट पडत असतानाच त्याने रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि गेटला ट्र्रॅक्टरचा दणका बसला. क्षणात गेट तुटून रेल्वे रुळावरच आडवे पडले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची पळापळ झाली. येथील कर्मचाऱ्यांनी अभियंत्यांना याबाबतची कल्पना दिली. पथक तातडीने याठिकाणी आले. रेल्वे पोलिसही त्याठिकाणी पोहचले.