मानाजी धुमाळ ।रेठरेधरण : मरळनाथपूर (ता. वाळवा) येथील खडी क्रशरवर मजुरी करणाºया गंगासागर राजू वाघमारे (वय ३०) या महिलेला प्रसूतीसाठी दवाखान्यात घेऊन जात असताना ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्येच प्रसूती झाली. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजता घडली. बाळ-बाळंतीण सुखरूप आहेत.
नांदेड-हिंगोली जिल्ह्यातील डोंगरखेडा या गावातील राजू वाघमारे व त्यांचे कुटुंब गेल्या चार वर्षांपासून मरळनाथपूर येथील सर्जेराव मोरे यांच्या क्र शरवर मजुरीकरिता राहिले आहे. ट्रॅक्टरवर चालक म्हणून पती राजू हे काम करतात. प्रसूतीसाठी वाघमारे यांनी आपल्या पत्नीचे इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात नाव नोंदविले होते.
दरम्यान, मंगळवारी गंगासागर वाघमारे यांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यासाठी पळापळ सुरू झाली; परंतु वाहन लवकर उपलब्ध झाले नाही. त्यामुळे पती राजू यांनी या महिलेसोबत इतर दोन महिलांना घेऊन ट्रॅक्टरमधून नेण्याचा निर्णय घेतला. ट्रॅक्टर दोन ते अडीच किलो मीटर अंतर पार करून रेठरेधरण स्टँडजवळ आल्यावर या महिलेस जास्त प्रमाणात वेदना होऊ लागल्याने चालकाने ट्रॅक्टर रस्त्याकडेला थांबविला. त्यावेळी ट्रॉलीमधील गंगुबाई रमेश देवकर व ललिता मानकर यांनी ट्रॉलीमध्येच प्रसूती प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली. रेठरेधरण येथील शालाबाई समिन्द्रे, सिंधू हणमंत पाटील या महिलांनीही यावेळी मदत केली. या महिलेने गोंडस कन्यारत्नास जन्म दिला असून, त्या दोघीही सुखरूप आहेत. त्यांना १०८ या रुग्णवाहिकेमधून इस्लामपूर येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.रेठरेधरण (ता. वाळवा) येथे मरळनाथपूर (ता. वाळवा) येथील गंगासागर राजू वाघमारे व त्यांना झालेले कन्यारत्न.