सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्वच व्यवसाय ठप्प असून, त्याचा फटका व्यापारी वर्गाला बसत आहे. त्यासाठी शासनाने एक दिवस अत्यावश्यक सेवा तर दुसऱ्या दिवशी इतर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने शासनाकडे करण्यात आली.
समितीचे सतीश साखळकर म्हणाले की, राज्य सरकारने निश्चित केलेल्या तिसऱ्या स्तरातून सांगली जिल्हा बाहेर पडलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्याही जैसे थेच आहे. त्यामुळे सध्याच्या कडक निर्बंधांचा फारसा उपयोग झालेला नाही. जिल्ह्यातील व्यापार शंभर टक्के उद्ध्वस्त झाला आहे. व्यापाऱ्यांवरील कर्जाचे व्याज, वीजबिल, स्थानिक स्वराज्य संस्था कर, कामगारांचे पगार सुरूच आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कडक लाॅकडाऊन करा अथवा सारेच व्यवसाय सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याऐवजी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत एक दिवस अत्यावश्यक सेवा व एक दिवस इतर व्यापार सुरू करण्यात यावा. जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबवावी, व्यापाऱ्यांची वीजबिल, कर्जाचे व्याज, स्थानिक स्वराज्य संस्था कर माफ करावेत, अशी मागणी शासनाकडे केली आहे.
यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, महेश खराडे, उमेश देशमुख, अमर पडळकर, अश्रफ वांकर, आसीफ बावा, विकास मगदुम, डॉ. संजय पाटील, आशिष कोरी, महेश पाटील, प्रशांत भोसले, राहुल पाटील, प्रदीप कांबळे, कामरान सय्यद उपस्थित होते.