सांगली : सांगली मार्केट यार्डातील बेदाणे सौदे सावळी (ता. मिरज) येथे स्थलांतरित करू नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना, मार्केट यार्डातील बेदाणा, अडत व व्यापारी, शिवसेनेचे नानासाहेब शिंदे व कानडवाडीचे माजी सरपंच अनिल शेंगुणशे यांनी सोमवारी निवेदनाद्वारे केली. सभापती सुजय शिंदे यांना मागण्यांचे निवेदन दिले.स्वाभिमानी शेतकरी संघटना, व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, सावळीतील जागा बेकायदेशीर खरेदी केल्याबाबत तक्रार केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. त्या जागेमध्ये उच्चदाब विद्युत वाहिनी, मोठा नाला असून ती जागा एन. ए. नाही. शेतकरी निवास, दळणवळणाची सोय नाही. वाहनांची सोय नाही. काही मोजके व्यापारी स्वतः पैसे खर्च करून शेड बांधण्याची चुकीची भूमिका घेत आहेत. या भूमिकेस आमचा विरोध असल्याचे शेतकरी, व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे लेखी सांगितले. कानडवाडीचे माजी सरपंच अनिल शेंगुणशे यांनीसुद्धा बेदाणा मार्केट सावळी येथील बेकायदेशीर जागेत हलवू नये, अशी भूमिका मांडली.
मार्केट यार्डातच बेदाणा सौद्यासाठी सुसज्ज हॉल करामार्केट यार्डमधील बेदाणा अडत व व्यापार करणाऱ्या तब्बल तीसहून अधिक व्यापाऱ्यांनी बेदाणा सौदे हलविण्यास विरोध केला आहे. सावळीला बेदाणा सौदे हलविण्याऐवजी मार्केट यार्डातच सुसज्ज हॉल करावा, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केली. सावळीत कुणाचीच सोय होत नाही, अशी भूमिकाही व्यापाऱ्यांनी बाजार समिती सभापतीसमोर मांडली.
व्यापाऱ्यांचे हित पाहू नका : संजय खोलखुंबेशेतकऱ्यांच्या जिवावरच सांगली मार्केट यार्ड चालत असताना त्यांच्यावर अन्याय करून व्यापाऱ्यांचे हित पाहिले जात आहे. बाजार समितीच्या या भूमिकेवर शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत. शेतकऱ्यांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खोलखुंबे व तालुका अध्यक्ष सुरेश वसगडे यांनी यांनी दिला आहे.
सावळीत दळणवळणासह सर्वच गैरसोय : नानासाहेब शिंदेशिवसेनेचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नानासाहेब शिंदे म्हणाले, मार्केट यार्डातील बेदाणे सौदे कोणा व्यक्तीसाठी बाहेर नेऊ नयेत. यार्डामध्ये शेतकरी, व्यापाऱ्यांची सोय होत आहे. दळणवळणासह सर्वच गैरसोयी सावळी येथे आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तिथे जाणे शक्य नाही. शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नका. बेदाणा सौदे मार्केट यार्डतून बाहेर नेल्यास बाजार समितीचा कर चुकणार आहे. यामुळे बेदाणा सौदे मार्केट यार्डातच झाले पाहिजेत.