लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील व्यापारी हा शत्रू नाही. त्याच्याकडे सहानुभूतीने पाहा. कायदा आणि व्यवहाराची सांगड घालत दंडात्मक कारवाई करावी, त्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊ नका, असे आवाहन गुरुवारी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी महापालिका, पोलीस व जिल्हा प्रशासनाला केले. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधीसोबत प्रशासनाची बैठक झाली. या वेळी प्रातांधिकारी डॉ. समीर शिंगटे, तहसीलदार डी.एस. कुंभार, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त राहुल रोकडे, पोलीस उपाधीक्षक अजित टिके उपस्थित होते.
व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा म्हणाले, कोरोनाच्या काळात प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले आहे. मात्र गेल्या काही दिवसांत किरकोळ चुकांबाबतही जबरी दंड ठोठावला आहे. पोलिसांनी व्यापाऱ्यांना शत्रू म्हणून पाहू नये. व्यापाऱ्यांना दिलेल्या नोटिसी मागे घ्याव्यात. १ मेनंतर दुकाने बंद ठेवण्याची आमची अजिबात क्षमता नाही. अतुल शहा यांनी व्यापाऱ्यांवर होत असलेल्या जबरी दंडात्मक कारवाईकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, शासनाच्या आदेशातच अनेक संभ्रम निर्माण करणाऱ्या बाबी आहेत. सध्या व्यापाऱ्यांची स्थिती वाईट आहे. दंड ठोठावताना त्याचे भान ठेवा. सुरेश टेंगले म्हणाले, फेरीवाल्यांवर कारवाई करण्याआधी संघटनेला आदेश द्या. आम्ही कोठेही गर्दी किंवा चुकीचे काही होऊ देणार नाही. पृथ्वीराज पवार आणि शंभुराज काटकर यांनी या काळात भाजीपाला विक्रीसाठी अनेक जण पुढे येतात. त्यामुळे ओळखपत्रे किंवा पास देताना पूर्वापार व्यवसाय करणाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी केली. शैलेश पवार म्हणाले, हॉटेलचालकांना पार्सल सुविधेची परवानगी दिली आहे. सध्या वाहतूकही सुरू आहे. अशा वेळी या वर्गाची गरज लक्षात घेऊन ट्रकचालकांसाठी हॉटेल सेवा देण्याची मुभा द्यावी. आम्हाला गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊ नका. अरुण दांडेकर यांनी किराणा दुकानदारांच्या वेळांबाबतच्या अडचणी सांगितल्या.
चौकट
लसीकरणासाठी मनपाने पुढाकार घ्यावा
मिरज व्यापारी संघटनेचे नेते विराज कोकणे म्हणाले, कोरोनाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या साठेबाजीची शक्यता आहे. त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. दुकानदार-व्यावसायिकांकडून कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले पाहिजे. त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची मागणी केली.