मिरज : प्रशासनाचे निर्बंध झुगारून सोमवारपासून दुकाने उघडून व्यापार सुरू करण्याचा निर्णय मिरजेतील व्यापारी संघटना व ‘मी मिरजकर’ फाउंडेशनने बैठकीत जाहीर केला. त्यामुळे प्रशासन व व्यापारी यांच्यात संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.
मी मिरजकर फाउंडेशनच्या पुढाकाराने मिरजेत रविवारी शहरातील सर्व व्यापारी संघटनांची एकत्र बैठक पार पडली. बैठकीत सोमवारपासून सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. फाउंडेशनचे निमंत्रक सुधाकर खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस नगरसेवक योगेंद्र थोरात, व्यापारी असोसिएशनचे अशोक शहा, गजेंद्र कुल्लोळी, वासू मेघानी, डॉ. प्रकाश लोखंडे, शीतल पाटोळे, वाय. सी. कुलकर्णी, अमित आहुजा, रिक्षा संघटनेचे महेश चौगुले, हॉटेल असोसिएशनचे नजीर शेख, फिरोज जमादार यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.
कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कोणतेही ठोस नियोजन केले नसून केवळ व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. महापालिका व राज्य शासनाचे सर्व कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांना चोरासारखे दुकान उघडण्याची वेळ आली असल्याचे गजेंद्र कुल्लोळी यांनी सांगितले. महापालिका व पोलीस यांच्याकडून व्यापाऱ्यांना अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याने आता व्यापाऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. याचा उद्रेक होणार असल्याचे अशोक शहा यांनी सांगितले.
कोरोनाबाबतचे सर्व निर्बंध पाळून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडावीत. प्रशासनाकडून कारवाईचा प्रयत्न झाल्यास आपण स्वतः विरोध करू, असे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी मास्क वापरावेत, कर्मचाऱ्यांना मास्क व हँडग्लोज द्यावेत, दारात सॅनिटायझर ठेवावे, दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. व्यापाऱ्यांनी स्वतःची व कर्मचाऱ्यांची चाचणी करून त्याचा दाखला जवळ ठेवावा. याचे पालन केल्यास कोणताही अधिकारी व्यापाऱ्यास दुकान उघडण्यापासून रोखू शकणार नाही, असे थोरात यांनी सांगितले. सुधाकर खाडे यांनी सोमवारपासून मिरजेतील सर्व दुकाने कोणत्याही परिस्थितीत उघडली जातील असे जाहीर केले. प्रशासनाने कोणत्याही व्यापाऱ्यावर कारवाई केल्यास मी मिरजकर फाउंडेशन व व्यापारी एकत्रित विरोध करतील, असेही त्यांनी सांगितले.