सांगली : लॉकडाऊनविरोधात संताप व्यक्त करीत सांगली, मिरजेतील व्यापारी शुक्रवारी (दि.२३ जुलै) दुकाने उघडणार आहेत. व्यापाऱ्यांच्या आंदोलनात भाजपचे खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्तेही उतरणार असल्याने यावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पोलिसांनी व्यापाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
सांगली जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यापार गेल्या शंभर दिवसांपासून बंद आहे. गेली महिनाभर व्यापारी सातत्याने लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी करीत आहेत. प्रशासनाने कोरोना रुग्णसंख्येच्या कारणावरून व्यापाऱ्यांची मागणी फेटाळत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून दुकाने सुरू करण्याचा इशारा दिला होता. आंदोलनात सर्व व्यापारी संघटना उतरणार असल्याने यावरून संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.
व्यापाऱ्यांनी एकीकडे आंदोलनाची तयारी केली असताना गुरुवारी पोलिसांनी बाजारातील काही व्यापाऱ्यांना दुकाने न उघडण्याबाबत सूचना दिल्याने व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. पोलीस व जिल्हा प्रशासन व्यापाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी केला आहे.
भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहे. बाजारपेठांमध्ये दुकानांबाहेर आम्ही उभे राहू, असा इशारा भाजपच्यावतीने देण्यात आला आहे.
चौकट
पुराची टांगती तलवार
एकीकडे दुकाने उघडण्याचे आंदोलन होत असतानाच सांगलीतील व्यापारी पेठांवर पुराची टांगती तलवार लटकत आहे. शुक्रवारी सांगलीची पाणीपातळी ३५ फुटांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना दुहेरी चिंता सतावत आहे.
चौकट
नुकसानीस जिल्हाधिकारी जबाबदार - समीर शहा
समीर शहा म्हणाले की, संभाव्य पूरस्थितीची कल्पना देऊन तळघरातील माल स्थलांतरी करण्याची परवानगी मागितली होती. प्रशासनाने या मागणीस कोणताही प्रतिसाद दिला नाही. आता पूरस्थिती निर्माण झाली असताना अचानक इतका माल स्थलांतरित करणे शक्य नाही. पुरात जर व्यापाऱ्यांचे नुकसान झाले तर त्याची सर्व जबाबदारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यावर असेल.
चौकट
संघर्ष होण्याची शक्यता
एकीकडे प्रशासनाने कडक लॉकडाऊनचे आदेश दिले असताना व्यापारी आक्रमक भूमिकेत दुकाने सुरू करीत आहेत. त्यात भाजपही सहभागी झाले आहेत. त्यामुळे दुकाने उघडण्यावरून व्यापारी, राजकीय कार्यकर्ते व पोलिसांत संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.