सांगली : लग्नगाठी या नशिबाने बांधल्या जातात, असे म्हटले जाते. मात्र ही नाती आघातांनी हिरावली तर काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर अनेकांकडे नसते. तरीही परंपरेचे, समाजाच्या मानसिकतेचे बंध तोडत सांगलीतील पाटील कुटुंबियांनी आपल्याच मोठ्या सुनेचे ऐन तारुण्यातच आलेले वैधव्य दूर करताना तिचे लग्न दिराशी लावून नव्या सुदृढ परंपरेची मुहूर्तमेढ रोवली.सांगलीतील शांताराम नामदेव पाटील यांचा मोठा मुलगा संतोष याचे लग्न इचलकरंजी येथील दत्तात्रय निवृत्ती पाटील यांची कन्या सोनाली हिच्याशी झाले होते. लग्न झाल्यानंतर दोन वर्षातच म्हणजे ५ आॅगस्ट २0१८ रोजी संतोषचे अल्पशा आजाराने निधन झाले.निधनासमयी तिची मुलगी सहा महिन्याची होती. पदरी छोटीशी कन्या आणि मोठ्या आयुष्याच्या अनिश्चित भविष्याची चिंता घेऊन सोनालीची वाटचाल सुरू झाली. मुलाच्या मृत्यूबरोबरच सुनेच्या भविष्याची आणि तिच्या दु:खाची चिंता तिची सासू राजश्री यांना वाटू लागली. राजश्री या पूर्वीपासूनच पुरोगामी विचाराच्या असल्याने त्यांनी सुनेचे वैधव्य दूर करण्याचा निर्णय घेतला.तिचा आयुष्यभर सांभाळ करायचा निर्णय घेतला तरी धाकटी सून म्हणून घरात येणारी स्त्री मोठ्या सुनेच्या मुलाला तितके प्रेम देईलच असे नाही. याशिवाय पुन्हा भविष्यातील या दोन्ही महिलांचे नातेसंबंध कसे राहतील याचीही चिंता त्यांना होती.
त्यामुळे राजश्री यांनी सोनालीचा विवाह तिच्या धाकट्या दिराशी म्हणजेच उमेशशी करण्याचा निर्णय घेतला. शांताराम यांना ही गोष्ट पटवून दिली. त्यानंतर त्यांनी सोनालीच्या आई-वडिलांना बोलावून त्यांनाही हा निर्णय सांगितला.परंपरेचे बंध तोडताना राजश्री यांनी समाजाचा विचार करण्यापेक्षा एका स्त्रीच्या आयुष्याचा विचार महत्वाचा असल्याचे सर्वांना सांगितले. त्यामुळे सर्वांनी या गोष्टीस होकार दिला.त्यामुळे सोनालीचा गत आठवड्यात तिच्या दिराशी म्हणजेच उमेश पाटीलशी विवाह झाला. सोनाली संतोष पाटीलची आता सोनाली उमेश पाटील अशी तिची नवी ओळख तयार झाली. त्यांच्या या नात्याला माणुसकीची किनार असल्याने समाजातील अनेक लोकांनी या निर्णयाचे कौतुक केले.