अविनाश कोळी ।सांगली : मिरज आणि सांगलीच्या संस्थानिकांनी सुरू केलेल्या स्टॅम्प हाफिस (आॅफिस) पासून सुरू झालेल्या मुद्रणकलेच्या रंजक इतिहासाने द्विशतकी उंबरठा ओलांडून आपल्या कक्षा रुंदावत त्यात अनेकांना सामावून घेतले. लाकडी ठोकळा, शिळा, लेटर प्रेस असे टप्पे ओलांडत आता डिजिटल तंत्राद्वारे या कलेने आधुनिकतेचे रंग उधळत रोजगाराच्याही संधी उपलब्ध केल्या आहेत.
सांगली व मिरजेतील तत्कालीन संस्थानिकांनी मुद्रणाला सुरुवात केल्याच्या नोंदी आहेत. यात सर्वात जुना इतिहास मिरज संस्थानचा आहे. १८०५ मध्ये मिरज संस्थानात ठोकळा छाप मुद्रण अस्तित्वात होते. त्याद्वारे स्टॅम्प छापले जात होते. त्यानंतर १८२२ ला तत्कालीन सांगलीचे पहिले श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी सांगलीत शिळा प्रेस उभारली. त्यावेळी याबाबतची बातमी हॉलंडमधील एका डच वर्तमानपत्रात छापून आली होती. महाराष्टÑात शिळा पद्धतीच्या छपाई तंत्राचा विकास होत असून, सांगलीसारख्या शहरातही यापद्धतीची छपाई सुरू झाल्याचा उल्लेख त्या डच वर्तमानपत्राने केला होता. त्यावेळी छपाईचे काम करणाºया व ती कला अवगत केलेल्या कलाकारांचे आडनावही छापखाने असे पडले.
आजही सांगलीत छापखाने आडनावाचे लोक राहतात. त्यांचे पूर्वबंध या मुद्रणसंस्थेशी, कलेशी जोडले गेले आहेत.शिळा प्रेस सांगलीत आणल्यानंतर त्यावर सुरुवातीला स्टॅम्प छापले जात होते. त्यामुळे त्यावेळचे लोक याला स्टॅम्प हाफिस म्हणायचे. काही दस्तऐवजातही आॅफिसऐवजी स्टॅम्प हाफिस असाच उल््लेख दिसतो. नंतरच्या काळात या प्रेसमध्ये पंचांग छापले जाऊ लागले. पंचांगापाठोपाठ छोट्या पुस्तकांची निर्मिती होऊ लागली. ज्यामध्ये बहुतांशी धार्मिक पुस्तके होती. ‘वेताळ पंचवीशी’, ‘पंचोपख्यान’, ‘भगवतगीता’ अशाप्रकारच्या पुस्तकांची निर्मिती झाली.
ब्रिटिश सरकारच्या काळात मिरज संस्थानिकांनी छपाई तंत्र असूनही वर्तमानपत्रांची छपाई होऊ दिली नव्हती. १८८० नंतर खासगी छापखान्यांची परंपरा सांगली, मिरजेत सुरू झाली. १९३८ मध्ये सांगली, मिरजेत १५ छापखाने अस्तित्वात असल्याचा उल्लेख आहे. सुरुवातीच्या काळात सरकारी छापखान्यांबद्दल प्रचंड उत्सुकता लोकांमध्ये दिसून येत होती. नंतर खासगी छापखाने अस्तित्वात आल्यानंतर मुद्रणाशी अनेकांचा संबंध येऊ लागला.
आधुनिकतेचे पंख लाभल्यानंतर मुद्रण कलेने समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या कवेत घेऊन व्यापक दर्शन घडविले. आज या व्यावसायात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. छपाईचा हा सर्व रंजक इतिहास मिरजेच्या इतिहास संशोधक मंडळाकडे उपलब्ध आहे.का साजरा केला जातो दिनमुद्रण कलेचे जनक योहानेस गुटेनबर्ग यांचा जन्मदिन २४ फेब्रुवारीला झाला. हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. १४३९ ला त्यांनी मुद्रणकलेचा आविष्कार करून १४५ मध्ये पहिल्या पुस्तकाची छपाई केली होती. त्यामुळेच त्यांना मुद्रणकलेचे जनक म्हटले जाते.तत्कालीन सांगली संस्थानिकांच्या काळात १८६६ मध्ये छापण्यात आलेले सचित्र पंचांग.