प्रताप महाडिक कडेगाव : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, आमदार विश्वजित कदम यांच्याविरोधात भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख निवडणूक रिंगणात उतरणार, हे निश्चित आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कदम-देशमुख घराण्यातील राजकीय सत्तासंघर्षाचे नवे पर्व सुरू होत आहे. यामुळे कदम-देशमुख या परस्परविरोधी घराण्यातील पारंपरिक लढत पुन्हा पाहण्यास मिळणार आहे.डॉ. पतंगराव कदम यांनी १९८५ व १९९० मध्ये अनुक्रमे अपक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक जिंकून भिलवडी-वांगी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. यानंतर १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत खऱ्याअर्थाने कदम-देशमुख घराण्यात थेट सत्तासंघर्ष सुरू झाला.
यावेळी काँग्रेसचे उमेदवार पतंगराव कदम यांचा अपक्ष उमेदवार संपतराव देशमुख यांनी पराभव केला. देशमुख यांचे अकाली निधन झाल्याने १९९६ मध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांनी काँग्रेसचे पतंगराव कदम यांचा पराभव केला.त्यानंतर १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा चार निवडणुका जिंकून पतंगराव कदम यांनी पूर्वीच्या भिलवडी-वांगी आणि सध्याच्या पलूस-कडेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यापैकी २००४ वगळता अन्य तीन निवडणुकांमध्ये पतंगराव कदम विरुद्ध पृथ्वीराज देशमुख यांच्यात थेट लढत झाली. डॉ. पतंगराव कदम यांना दीर्घकाळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. दरम्यान, देशमुख कुटुंबीयांनीही दोन साखर कारखाने, दोन सूतगिरण्या आणि दूध संघ उभारून कदम यांना शह दिला.दरम्यान, डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी विश्वजित कदम यांना विधानसभेवर बिनविरोध संधी मिळाली. आमदार झाल्यावर विश्वजित कदम यांनी अल्पावधित मतदारसंघ आणि विधानसभेत उल्लेखनीय कामगिरी केली.
दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदचे विद्यमान अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनीही पारदर्शक कारभार करीत, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या आहेत. या निवडणुकीत विश्वजित आणि संग्रामसिंह हे दोन्ही तगडे उमेदवार आमने-सामने येणार, हे जवळपास निश्चित आहे. यात बाजी कोण मारणार? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे.