मिरज : मिरजेतील कृष्णा घाटावरील कृष्णा नदीवरील पुलावरील वाहतूक १० ते २० जुलैपर्यंत सकाळी अकरा ते साडे अकरा यावेळेत, प्रति दिन तीस मिनिटांसाठी बंद करण्यात आली आहे.
मिरजेत कृष्णा नदीवर १९९४ साली पूल बांधला असून, या पुलास तीस मीटर लांबीचे सात गाळे आहेत. त्याची एकूण लांबी २१४ मीटर आहे. सुरक्षितेसाठी त्याचे बेअरिंग बदलणे, एक्स्पान्शन जॉइंट बदलणे, दुरुस्ती करणे ही कामे प्रस्तावित आहेत. ही दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक असल्याने प्रथम प्राधान्याने पुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम दहा दिवस चालणार आहे. या पुलाचे बेअरिंग बदलण्यासाठी दि. १० ते २० जुलैपर्यंत प्रति दिन एका गाळ्याचे बेअरिंग बदलायचे आहे. एका गाळ्याचे बेअरिंग बदलण्यासाठी तीस मिनिटांचा अवधी लागणार असल्याने सकाळी अकरा ते साडे अकरा या वेळेत पुलावरून वाहतूक बंद करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दि. १० ते २० जुलैपर्यंत सकाळी अकरा ते साडे अकरा यावेळेत प्रति दिन तीस मिनिटांसाठी कृष्णा घाटावर कृष्णा नदीवरील पुलावरून वाहतूक बंद करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार स्थानिक प्रशासनाने प्रवासी, नागरिक, शेतकरी व अन्य वाहनधारकांना पुलावरून वाहतूक बंदी केली आहे.