फोटो ओळी : घाटनांद्रे (ता. कवठेमहंकाळ) येथील गावांतर्गत दिघंची-हेरवाड राज्यमार्ग अरुंद असल्याने वाहतुकीची कोंडी होत असते.
घाटनांद्रे : घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथे गेल्या दोन-तीन वर्षांपासून अगदी मंद गतीने सुरू असलेले दिघंची-हेरवाड राज्य मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र गावात हा रस्ता अरुंद असल्याने आणि अनेक अपुऱ्या कामांमुळे येथे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
या रस्त्याचे काम घाटमाथ्यावर पूर्ण झाले आहे. परंतु घाटनांद्रे गावात रस्त्याचे काम अपुरे आहे. कुठेही खुदाई अथवा भराव न टाकता व कुठेही रुंदीकरण, खोलीकरण न करता होत आहे. त्या रस्त्यावर केवळ डांबर टाकण्याचा प्रकार करण्यात आला आहे. रस्त्यालगत बंदिस्त गटार, गतिरोधक व दिशादर्शक फलक यांचा अभाव आहे.
गावाबाहेर हा रस्ता ऐसपैस झाला असल्याने वाहनेही भरधाव वेगाने येतात. मात्र गावात आल्यावर रस्ता अगदीच अरुंद असल्याने वाहनांची गर्दी होत असते. एका वेळी दोन वाहने अजिबात पास होत नाहीत. अशी वेळ आली तर समोरासमोर येणाऱ्या वाहनांपैकी एक वाहन मागे घेऊन दुसऱ्या बोळात घातल्याशिवाय पर्याय राहत नाही.
अद्यापही हा रस्ता पूर्ण झाला नाही तर ही अवस्था, तर भविष्यात हा रस्ता पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर काय अवस्था होणार हा प्रश्न निर्माण होत आहे. अन्यथा हे दुखणे उशाला घेण्यासारखा प्रकार होणार यात शंका नाही. यावर विचार होणे गरजेचे बनले आहे.