दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत असून, सर्वसामान्य नागरिक वाहनचालक त्रस्त आहेत. सध्या दिघंचीत मल्हारपेठ-पंढरपूर व दिघंची-हेरवाड या राज्यमार्गाचे काम सुरू आहे. परिणामी रस्त्यावर धुळीचे साम्राज्य आहे. एकीकडे धूळ व दुसरीकडे वाहतूक काेंडीचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
दिघंची बसस्थानक आटपाडी रोड आण्णा भाऊ साठे पेट्रोल पंप परिसर या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात असते. बसस्थानक परिसरात रस्त्यालगत फळविक्रेते असल्याने या ठिकाणी बेशिस्त पार्किंग होत आहे. या ठिकाणी रस्त्यालगतच दुकाने असल्याने व पार्किंगची सोय नसल्यामुळे अनेक ग्राहक आपली दुचाकी व चारचाकी गाड्या रस्त्यावर लावूनच खरेदी करण्यासाठी दुकानात व हॉटेलमध्ये जातात. रस्त्यावर गाड्या उभ्या केल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. आटपाडी तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ दिघंचीची असल्याने सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील नागरिक बाजारासाठी दिघंचीत येत असतात. रविवारी दिघंचीचा बाजार असल्याने शहीद भगतसिंग चौक दिघंची हायस्कूल परिसर ते बसस्थानक परिसरात पूर्णपणे वाहतूक कोंडी होते. ग्रामपंचायतीने अतिक्रमणे व वाहतूक काेंडीचा प्रश्न साेडवावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून हाेत आहे.
फोटो : २७ दिघंची १
ओळी : दिघंची (ता. आटपाडी) येथे रविवारच्या आठवडा बाजारात बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी हाेते.