लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : सांगली शहरातील सांगली-कोल्हापूर रस्त्यावर शनिवारी सकाळी भाजीपाला विक्री बाजार भरला होता. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.
सांगली-कोल्हापूर रस्त्यावर पूर ओसरल्याने शनिवारी सकाळी साडेसहा वाजता रस्त्यावर बाजार भरला होता. या ठिकाणी पालेभाज्या विक्री करण्यासाठी विक्रेते बसले होते. खरेदीसाठी नागरिकही रस्त्यावर उतरले होते. यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण झाली. वाहनचालकांना गर्दीतून वाहणे चालविणे कठीण झाले होते. काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. वाहतूक पोलीस नसल्याने वाहतूक कोंडीतूनच मार्ग काढत वाहनांना पुढे जावे लागले. अनेक नागरिक व विक्रेते मास्क वापरत नसल्याचे आढळून आले. यामुळे कोरोनाचाही धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महापालिकेने रस्त्यावरचा हा बाजार बंद करून विक्रेत्यांना भाजीमंडई उभारून द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.