सांगली : वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी दिवस-रात्र रस्त्यावर थांबलेल्या वाहतूक पोलिसांचेआरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावरील धूर, धुळीमुळे पोलिसांना श्वसनासह फुप्पुसाचे आजारही होऊ लागले आहेत. जिल्ह्यातील वाहतुकीच्या शाखेकडील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सोमवारी आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत श्वसनाचे विकार असल्याचे समोर आले. वाहतूक पोलिसांनी नित्याने मास्क वापर करावा, असा सल्लाही वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने प्रथमच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येथील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये झालेल्या शिबिराचे उद्घाटन पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या हस्ते झाले. यावेळी मिरजेतील डॉ. पृथ्वीराज मेथे, वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.
डॉ. तेली म्हणाले की, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस कर्मचारी रस्त्यावर असतात. धुळीसह वाहनातून निघणाऱ्या धुरामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता आहे. अंमलदारांनी नित्याचा व्यायाम, सकस आहार आणि आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.डॉ. पृथ्वीराज मेथे यांनी प्रत्येक अधिकारी आणि अंमलदाराची तपासणी केली. त्यात प्रामुख्याने फुप्फुसाची क्षमता, ॲलर्जीसह ईसीजी, शुगर, बीपी तपासणी करण्यात आली. त्यातील काही जणांना श्वसनाचे विकार असल्याचे समोर आले.
डॉ. मेथे म्हणाले, मोठ्या शहरात पाच पैकी एकास श्वसनाचा विकार होतो. धूळ आणि प्रदूषण त्याला कारणीभूत आहे. त्यामानाने सांगलीत ते प्रमाण कमी आहे; परंतु वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मास्कचा वापर केला पाहिजे. यावेळी डॉ. मृण्मयी पाटील, डॉ. सिद्धांत पारखे, अमोल लोंढे, मल्लाप्पा कांबळे, निशा तुपसागर, सुनील जालीपाडू यांच्यासह रुग्णालयाचा स्टाफ उपस्थित होता.