इस्लामपूर : इस्लामपूर पालिकेतील कारभार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोर’ असाच म्हणावा लागेल. गेल्या ३१ वर्षात ‘एक कारभारी संसार भारी’ असा सुखी संसार होता. पण आता ‘एक अनाडी बाकी खिलाडी’ अशी अवस्था पालिका प्रशासनाची झाली आहे. विकास आघाडीने सादर केलेल्या अंदाजपत्रकावर सभागृहात गदारोळ झाला. याचा चलचित्रपट इस्लामपूरकरांनी पाहिला. विकास आघाडीचा हा फक्त ट्रेलर आहे, पुढे सिनेमा बाकी आहे, हे जनतेला आता कळले आहे.माजी मंत्री, आमदार जयंत पाटील आणि पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची सत्ता अबाधित होती. विरोधी गटातील विरोधी पक्षनेते विजय कुंभार सोडले, तर शिवसेनेचे आनंदराव पवार, महाडिक गटाचे कपिल ओसवाल हे वळवाच्या पावसाप्रमाणे पालिकेत हजेरी लावत होते. त्यामुळे तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीचा सभागृहात ‘हम करेसो कायदा’ होता. राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांना बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. त्यातूनही बी. ए. पाटील, संजय कोरे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते विरोध करताना दिसत होते. त्यांचा आवाज दाबण्याची कला मात्र विजयभाऊ पाटील आणि अॅड. चिमण डांगे यांच्याकडे होती.आता नवीन सभागृहात मात्र महिला सदस्यांसह सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधी राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पालिकेतील सर्वच बेकायदेशीर काळी कृत्ये चव्हाट्यावर येणार आहेत. विकास आघाडीतून जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष निशिकांत पाटील शैक्षणिक संकुलातून अचानक पालिकेच्या राजकारणात आले. त्यामुळे ते आजही अनाडीच आहेत. त्यांच्याबरोबर असणारे विक्रमभाऊ पाटील, वैभव पवार खिलाडी आहेत. या खिलाडींना आवरण्यासाठी निशिकांत पाटील यांनी माजी नगरसेवक भास्कर कदमसारखा तगडा रनर पालिकेच्या प्रशासनात ठेवला आहे. विक्रमभाऊ पाटील आणि भास्कर कदम यांच्यातही वाद झाल्याची चर्चा आहे. सभागृहात पीठासन अधिकारी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांची ताकद वगळता, विकास आघाडीकडे काहीच उरले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतील पक्षप्रतोद संजय कोरे, शहाजी पाटील, डॉ. संग्राम पाटील, विश्वास डांगे, अॅड. चिमण डांगे, आनंदराव मलगुंडे यांच्यासह सौ. मनीषा पाटील, सुनीता सपकाळ या पालिकेच्या कारभारात सक्रिय झाल्या आहेत. त्यांना ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच नगराध्यक्ष निशिकांत पाटील कसे अकार्यक्षम आहेत, हे पटवून देण्यासाठी तत्कालीन पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील पालिकेच्या बाहेर राहून खेळ्या करत आहेत.पालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत हजेरी रजिस्टर पळवा-पळवीचे राजकारण तापले आहे. हा फक्त ट्रेलर आहे, यापुढे विकास कामातील टक्क्यावरुन मुख्य सिनेमा जनतेसमोर येणार आहे. (वार्ताहर)
यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!
By admin | Published: March 01, 2017 11:58 PM