लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लॉकडाऊन काळात स्पेशल रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट सुरू आहे. गाडी तीच असली तरी तिला स्पेशल नाव दिल्याने अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागत आहेत.
लॉकडाऊन काळात रेल्वेची प्रवासी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. या काळात काही लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या पूर्ववत सुरू करण्यात आल्या. गाड्या त्याच असल्या तरी त्यांचे मूळचे क्रमांक बदलले गेले. क्रमांकापुढे शून्य जोडून स्पेशल दर्जा दिला गेला. या दर्जानेच प्रवाशांची लूट सुरू केली. स्पेशल दर्जामुळे नेहमीचे भाडे दीडपटीपर्यंत वाढले. कोणत्याही प्रवासासाठी किमान १०० किलोमीटरचे भाडे आकारले जात आहे. मिरजेतून कोल्हापूरला एक्स्प्रेसने ३० रुपयांत जाता यायचे, पण आता स्पेशल गाडीने जायचे झाल्यास किमान १०० किलोमीटरचे प्रवासभाडे मोजावे लागते.
एक्स्प्रेस गाड्यांचे डबेही रेल्वेने लॉकच ठेवले आहेत, त्यामुळे प्रवाशांना जादा भाडे मोजण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पॅसेंजर गाड्याही बंद आहेत. लॉकडाऊन काळात रेल्वे सर्वसामान्यांची राहिलेली नाही.
बॉक्स
या आहेत स्पेशल गाड्या
यशवंतपूर- अजमेर एक्स्प्रेस, यशवंतपूर-जोधपूर एक्स्प्रेस, यशवंतपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस, मिरज-बेंगळुरू राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस, हुबळी-दादर एक्स्प्रेस, गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस, कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेस.
बॉक्स
तिकीद दरात रेल्वेची मनमानी
- स्पेशल एक्स्प्रेसच्या नावाखाली तिकीट दर वाढविताना रेल्वेकडे याचे कोणतेही समर्पक कारण मात्र नाही.
- यापूर्वी सणासुदीच्या दिवसांत नेहमीच्या गाड्यांपेक्षा काही जादा गाड्या स्पेशल स्वरूपात सोडल्या जायच्या.
- सध्या लॉकडाऊन काळात मात्र नेहमीच्याच गाड्यांना जादा भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे.
बॉक्स
फेस्टीव्हल सिझनमध्ये सवलत द्या
- कोरोनामुळे रेल्वे पूर्ण क्षमतेने धावत नाहीत, परिणामी जादा भाड्याद्वारे नुकसान भरून काढण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.
- सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने प्रवाशांची गर्दी वाढत आहे, त्यामुळे जादा भाड्याचा निर्णय रेल्वेने मागे घेण्याची मागणी होत आहे.
कोट
रेल्वेकडून प्रवाशांची लूट
रेल्वेकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. सध्या लॉकडाऊन शिथिल झाल्याने रेल्वेचा स्पेशल दर्जा रद्द करायला हवा. नेहमीच्या वेळापत्रकानुसार एक्स्प्रेस गाड्या नेहमीच्या दरात धावायला हव्यात.
- प्रा. कृष्णा आलदर, सांगली
एक्स्प्रेस गाड्या पूर्ववत पूर्ण क्षमतेने सोडल्या पाहिजेत. त्याचबरोबर पॅसेंजर गाड्याही सुरू कराव्यात. पॅसेंजर सुरू नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. सर्व व्यवहार सुरू झाल्याने प्रवाशांना आता रेल्वे सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
- रोहित जाधव, प्रवासी, सांगली