सांगली : ‘मर्चंट नेव्ही’मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून परराज्यातील तरुणांना गंडा घालणाऱ्या सांगलीतील चौगुले मरीन एज्युकेशन अॅन्ड ट्रेनिंग सेंटरच्या तिघांविरुद्ध अखेर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सेंटरमधील प्रशिक्षक अमोल अण्णापा चौगुला (वय २३, रा. बाळेगिरी, ता. अथणी) यास अटक केली आहे. एकूण सात फसगत झालेल्या तरुणांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांची १२ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
मल्लिाकार्जुन उमेश चौगुले व सुनील मुरग्याप्पा चौगुले अशी गुन्हा दाखल झालेल्या अन्य दोघांची नावे आहेत. यातील मल्लिाकार्जुन हा मुख्य संशयित आहे. त्याने दोन वर्षापूर्वी विश्रामबाग येथील हॉटेल ‘हनुमान’जवळ हार्मोनी रेसीडन्सी या संकुलात तळघरात चौगुले मरीन एज्युकेशन अॅन्ड ट्रेनिंग सेंटर सुरु केले. परराज्यातील वृत्तपत्रात ‘मर्चंट नेव्ही’मध्ये शंकर टक्के नोकरीची संधी, या मथळ्याखाली जाहिरात प्रसिद्ध केली. ही जाहिरात वाचून मार्च २०१८ मध्ये म्हैसूर, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व केरळ येथील तरुणांनी प्रत्येकी एक लाख साठ हजार रुपये भरुन प्रवेश घेतला. विश्रामबाग येथील हसनी आश्रमजवळ अडीच महिने तरुणांना जहाजाचे इंजिन व वेल्डींगबाबचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर या तरुणांना उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे नेले. तिथे पंधरा दिवस प्रात्यक्षिक करुन घेतले. पण यासाठी प्रत्यक्षात कोणत्याही जहाजावर नेले नाही.
प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे सांगून तरुणांना पोस्टाने प्रशस्तीपत्र घरी पाठविले. पण नोकरीबाबत मल्लिकार्जुन चौगुलेसह तिघांनी काहीच हालचाली केल्या नाहीत. तरुणांनी चौगुले यांच्याशी मोबाईवर संपर्क केला. पण ते मोबाईल घेत नव्हते. एकाही तरुणाला नोकरी लागली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणांनी गुरुवारी रात्री विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिलकेश बिल्लवा डेराण्णा (वय २४, रा. हक्कातूर, ता. मडिकेरी, जि. कोडगू, कर्नाटक) याने सात जणांच्यावतीने फिर्याद दिली आहे. यामध्ये स्टिवन डिसुजा, मल्लिाकार्जुन अळीचंडी, डेव्हीड थॉमस, यशवंत गौडा, कºयाप्पा पुत्रप्पा व वरुण एस. एस. या फसगत झालेल्या तरुणांचा समावेश आहे. प्रत्येक उमेदवाराकडून एक लाख ६० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच मल्लिाकार्जुन व सुनील चौगुले पसार झाले आहेत.जाहिरात कर्नाटकातसंशयितांनी कर्नाटकातील वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करुन तेथील तरुणांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढल्याचे स्पष्ट झाले आहे. फसवणूक झालेल्या तरुणांच्या घरची परिस्थिती हलाकीची आहे. दागिने विकून, तसेच कर्ज काढून काहींनी एक लाख ६० हजार रुपये भरले आहेत. कर्नाटकातील अनेक तरुणांची फसवणूक झाली आहे. पण येथे येण्यासाठी त्यांच्याकडे प्रवास भाड्यासाठी पैसेही नाहीत.