आष्टा : आष्टा नगरपरिषदेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२०-२१ अंतर्गत घंटागाडी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. आष्टा शहरामध्ये दहा घंटागाड्यांमार्फत शहरातील सर्व वॉर्डमधील कचरा गोळा केला जातो. कचरा गोळा करत असताना ओला, सुका आणि घातक असा तीन प्रकारांमध्ये विभागला आहे.
नगरपरिषदेतर्फे रोज सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत शहरातील सर्व भागात घंटागाडी फिरवली जाते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून घंटागाडीच्या सर्व कर्मचाऱ्यांना अचूक कामाची कार्यप्रणाली समजावण्यात आली. प्रत्येक घरातील कचरा गोळा केलाच पाहिजे याची जाणीव करून देण्यात आली. नागरिकांकडून कचरा गोळा करताना तो ओला, सुका वेगळा गोळा करून, वेगळा संकलित केला जावा अशा सूचनाही देण्यात आल्या.
शहरातील नागरिकांनी आपल्या घराजवळ येणाऱ्या घंटागाडीचा नंबर, नाव आणि कर्मचाऱ्याचा फोन नंबर याची नोंद करून आवश्यक तेव्हा घंटागाडीला बोलवावे आणि शहर स्वच्छ ठेवावे. आष्टा नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी कचरा घंटागाडीमध्ये टाकण्याचे आणि शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे. ओला कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते. यामुळे नागरिकांनी ओला कचरा वेगळा देणे गरजेचे आहे. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, नोडल ऑफिसर आसावरी सुतार, स्वच्छता निरीक्षक आर. एन. कांबळे, सिटी कोऑर्डिनेटर प्रणव महाजन आणि कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : २९१२२०२०-आयएसएलएम- आष्टा पालिका न्यूज
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आष्टा पालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणप्रसंगी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, आसावरी सुतार, प्रणव महाजन, आर. एन. कांबळे, आदी उपस्थित होते.