सांगली: शाळांच्या समग्र प्रगतीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत राज्यामधील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वीस अध्यापन करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांसाठी निष्ठा (नॅशनल इनिशिएटीव्ह फॉर स्कूल हेडस् ॲण्ड टीचर्स हॉलिस्टीक ॲडव्हान्समेंट) प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यातील 10 तालुके व महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 6 हजार 232 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्य स्तरावर हे प्रशिक्षण 19 ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीत आयोजित करण्यात आले असून 25 डिसेंबर 2019 पासून सांगली जिल्ह्यातील 11 केंद्रावर हे प्रशिक्षण प्रत्येकी पाच दिवसाच्या टप्प्याने पूर्ण केले जाणार आहे. अशी माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली चे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी दिली.या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यामध्ये 11 केंद्र स्थापन करण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर पाच केंद्रीय साधन व्यक्ती आणि 1 राज्य स्त्रोत व्यक्तींच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. गुणवत्ता संवर्धन आणि आनंददायी शिक्षणासाठी शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, कडेगांव, कवठेमहांकाळ, खानापूर, मिरज, पलूस, म.न.पा. शिराळा, तासगांव व वाळवा या 11 तालुका / म.न.पा च्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.
प्रत्येक केंद्रासाठी पाच साधनव्यक्ती तसेच प्रत्येकी एक राज्य साधनव्यक्ती राज्यस्तरावरुन नियुक्त करण्यात आला आहे. अशा तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्ह्यातील 5101 प्राथमिक व 1131 उच्च प्राथमिक अशा एकूण 6232 शिक्षकांना हे प्रशिक्षण मिळणार आहे.
अध्ययन निष्पत्ती, क्षमता आधारित अध्ययन व मूल्यमापन, विद्यार्थी केंद्रित अध्यापन शास्त्र, शाळा सुरक्षितता व सुरक्षा, वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्ये, समावेशित शिक्षण अध्ययन-अध्यापनातील माहिती व तंत्रज्ञानासह कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर, आरोग्य व योगा, ग्रंथालय, पर्यावरण क्लब, किचन गार्डन, युवा क्लब, शालेय नेतृत्व गुणविशेष, पर्यावरण जाणीव जागृती, शाळापूर्व शिक्षण, आनंददायी वातावरणात शाळापातळीवरील मूल्यमापन इत्यादी विषयाच्या अनुषंगाने विषयनिहाय प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाणार असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी सांगितले.निष्ठा प्रशिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय नियोजन बैठक नुकतीच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे प्रतिनिधी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, प्रतिनिधी, विषय सहाय्यक, विषय साधनव्यक्ती उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी निष्ठा प्रशिक्षण विषयी माहिती सांगितली. वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. विकास सलगर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना नियोजनासंदर्भात राज्य स्तरावरुन आलेल्या सूचनांविषयी अवगत केले. तसेच निष्ठा प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांचा कृतियुक्त सहभाग घेवून हे प्रशिक्षण जिल्ह्यात यशस्वी करावे, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.