लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महानगरपालिकेच्या बदली कर्मचाऱ्यांना आता रविवार आणि सार्वजनिक सुटीच्यादिवशी काम मिळणार आहे. येत्या ११ एप्रिलपासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
या सुधारित निर्णयामुळे आता बदली कामगारांना १५ ते २० दिवस काम मिळणार आहे. याचबरोबर बदली कामगारांना रोटेशनप्रमाणे काम देण्याबाबतही विचार केला जात असल्याचे आयुक्तांनी शिष्टमंडळाशी बोलताना स्पष्ट केले. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि स्थायी सभापती पांडुरंग कोरे उपस्थित होते.
महापालिकेच्या बदली कामगारांना २६ दिवस काम मिळावे, अशी बदली कर्मचाऱ्यांची मागणी होती. तसेच सुटीच्या कालावधीत बदली कामगारांना काम मिळावे, यासाठी पै. पृथ्वीराज पवार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे शहर जिल्हाध्यक्ष श्रीराम सासणे, उपाध्यक्ष विनोद तिवडे, खजिनदार राजू सव्वाशे, सचिव विनायक मोरे, संचालक अजित चौगुले, सुरेखा सव्वाशे, जोया सोकटे, अनिल मोहिते, दयानंद आळतेकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी बदली कामगारांबाबत सहानुभूती असल्याचे सांगत आयुक्त कापडणीस यांनी रविवारी आणि सार्वजनिक सुटीच्यादिवशी बदली कामगारांना काम देण्याबाबत आमचे नियोजन झाल्याचे सांगितले.