सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एखादा बिनविषारी साप जरी कुठे आजुबाजूला दृष्टीस पडला, तर प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडतो. पण कवलापूर (ता. मिरज) येथील राजेंद्र पुंडलिक माळी (वय ५०) यांनी बुलेटवरुन चक्क नागासोबत २५ किलोमीटरचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान गाव जवळ आल्यानंतर नागाने हॅन्डलवरुन फणा काढल्यानंतर मात्र त्यांनी बुलेट लागलीच रस्त्याकडेला घेतली. दोन तासाच्या अथक् प्रयत्नानंतर वायरिंगमध्ये घुसलेला हा तीनफुटी नाग बाहेर काढण्यात त्यांना यश आले.कवलापुरातील जखीण मळ्यात राहणारे राजेंद्र माळी द्राक्ष बागायतदार आहेत. पाण्याची इलेक्ट्रीक मोटर आणण्यासाठी ते बुलेटवरुन (क्र. एमएच १०, सीझेड ६७७७) सांगलीत कोल्हापूर रस्त्यावरील भंगार बाजारात आले होते. बाजारात ते अर्धा तास होते. मोटर खरेदी केल्यानंतर ते कवलापूरला येण्यास निघाले. बुधगाव कॉलेजवजळ ते गेल्यानंतर बुलेटच्या हेडलाईटपासून काही तरी डोकावल्याचे त्यांच्या लक्षात आले. उंदीर असेल, असे माळी यांना वाटले. काही अंतरावर गेल्यानंतर अचानक हॅन्डलपासून नागाने फणाच काढला. माळी यांनी तातडीने बुलेट रस्त्याकडेला घेतली. तोपर्यंत नाग पुन्हा हेडलाईटजवळ लपून बसला. माळी यांनी बुलेट सुरु करुन जोरजोराने रेसही केली. पण नाग बाहेर पडला नाही. काठीने हेडलाईडजवळ बडविले. तरीही तो बाहेर आला नाही. बुलेट रस्त्यावर पाडून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही तो दिसतच नव्हता.माळी पुन्हा धाडसाने बुलेटवर बसले. तेथून ते थेट गावात गेले. एका पंक्चर काढण्याच्या दुकानात गेले. हवा मारण्याच्या इलेक्ट्रीक पंपाने हेडलाईटजवळ हवा सोडण्यात आली. पंधरा-वीस मिनिटे हा प्रकार सुरु होता. परंतु नाग काही बाहेर आला नाही. त्यानंतर माळी यांनी बुलेट गॅरेजमध्ये मेस्त्रीकडे नेली. मेस्त्रीने हेडलाईट खोलून काढला. त्यावेळी वायरिंगमध्ये नाग लपलेला दिसला.प्राणीमित्र राजाराम शिंदे यांना बोलावून घेण्यात आले. शिंदे यांनी शेपटीला धरुन हा नाग बाहेर काढला. चिडलेल्या या नागाने शिंदे यांना दंश करण्याचा प्रयत्न केला. तरीही शिंदे यांनी त्यास कौशल्याने हाताळून सुरक्षित ठिकाणी सोडले.कसरतीवर कसरतदुपारी चार वाजता नागाने दर्शन दिल्यानंतर तो बाहेर काढण्यासाठी माळी यांचे प्रयत्न सुरु होते. रस्त्यावर तसेच पंक्चर दुकानातही प्रयत्न केला. तरीही नाग बाहेर आला नाही. गॅरेज चालकाने हेडलाईट खोलल्यानंतरच हा नाग बाहेर काढता आला. यासाठी दोन तास कसरत करावी लागली.शेतात राहत असल्याने सातत्याने सापांचे दर्शन होते. बुलेट घराबाहेर अंगणातच लावलेली असते. कदाचित रात्रीच्यावेळी हा नाग बुलेटच्या वायरिंगमध्ये घुसला असावा. तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होता. प्रसंगावधान ओळखून वेळीच बुलेट थांबवून काळजी घेतल्याने पुढील अनर्थ टळला.- राजेंद्र माळी, शेतकरी, कवलापूर
कवलापूरच्या शेतकऱ्याचा नागासोबत बुलेटवरून प्रवास; हॅन्डलवरून ‘फणा’ काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 11:34 PM