सांगली : सुट्ट्या आणि रविवारी राखी पोर्णिमेमुळे खासगी बसेस फुल्ल होत आहेत. खासगी बससेवेचे दर राखी पोर्णिमेमुळे वाढविण्यात आले आहेत. सांगली ते मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, गोवा आदी सर्वच मार्गांवर खासगी बससेवांचे (एसी स्लीपर) भाडे दीडपट ते दुप्पट वाढवले आहेत. सांगली ते मुंबई ७०० रुपये भाडे होते. यामध्ये ५०० ते ६०० रुपयांची वाढ करुन शनिवार, रविवारसाठी ११०० रुपये भाडे केले आहे.
सण, सुट्ट्यांच्या हंगामात खासगी बसचालकांकडून जादा दर आकारले जाण्याची तक्रार कायम असते. सध्या कोरोनाचे संकट काही प्रमाणात कमी झाल्यामुळे रेल्वे, एस. टी.सह खासगी बसेसनाही प्रवाशांची गर्दी आहे. प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी शनिवारपासून चार दिवस खासगी बसचालकांनी प्रवासी दरात दीडपट वाढ केल्याचे दिसत आहे. एसी स्लीपरच्या भाडेवाढीबरोबरच बसून जाण्याच्या भाड्यातही वाढ केली आहे. लांबपल्ल्याच्या सर्वच मार्गांवरील बसच्या भाड्यात वाढ केली आहे.
चौकट
या मार्गावर ट्रॅव्हल्सची भाडेवाढ (एसी स्लीपर)
मार्ग इतर दिवस सुट्टीतील वाढ
सांगली ते नागपूर १२५० ते १३५० रु. १८०० ते २२२० रु.
सांगली ते मुंबई ६५० रु. ते ७०० रु. १०५० ते ११०० रु.
सांगली ते पुणे ३५० ते ४०० रु. ५०० ते ६०० रु.
सांगली ते औरंगाबाद ८५० ते ९०० रु. ९५० ते १००० रु.
कोट
डिझेल दरवाढ, आरटीओचे कर आणि विमा हप्ता, बँकांचे कर्ज या सर्वांचा हिशोब भागवताना ट्रॅव्हल्स चालकांची मोठी कसरत होत आहे. त्यात सलग दोन वर्षे कोरोनाची भर पडली आहे. ट्रॅव्हल्स चालक कर्जबाजारी झाला आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता असल्यामुळे व्यवसाय सुरु आहे. त्यात सुट्टीच्या दिवशी काही प्रमाणात दरवाढ करुन तोट्याचे संतुलन ठेवण्याचा प्रयत्न आहे.
- पंकज पाटील, ट्रॅव्हल्स व्यावसायिक.
चौकट
ट्रॅव्हल्सची संख्या ५० टक्केंनी घटली
- पाच वर्षांपूर्वी सांगली शहरातून देशभरात विविध ठिकाणी ३० ते ३५ ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेऊन जात होत्या आणि तेवढ्याच येतही होत्या. पण, पाच वर्षांनंतर ट्रॅव्हल्सची संख्या वाढण्याऐवजी ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. सध्या सांगलीतून केवळ १५ ते १७ ट्रॅव्हल्सच सुरु आहेत.
- डिझेल दरवाढ, कोरोनाच्या संकटामुळे अनेक ट्रॅव्हल्स चालकांनी गाड्यांची विक्री करुन व्यवसाय बंद केल्याचे ट्रॅव्हल्स चालकांनी सांगितले.