विटा : रेवणगाव (ता. खानापूर) येथे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री वेताळगुरू देवाच्या यात्रेस आज रविवारपासून प्रारंभ होत असून, यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विटा आगाराने जादा बस सेवा सुरू केली.
रेवणगाव येथील श्री वेताळगुरूदेव हे जागृत देवस्थान समजले जाते. गुढीपाडव्यादिवशी यात्रा साजरी होत असून, लाखो भाविक श्री वेताळगुरूदेव दर्शनासाठी हजेरी लावतात. खानापूर तालुक्यातील सर्वात मोठी व रात्री भरणारी यात्रा हे या यात्रेचे वेगळे व प्रमुख वैशिष्ट्य आहे. रविवारी सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे खास यात्रेसाठी विटा आगाराने विटा व खानापूर येथून विशेष जादा बस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रविवारी रात्री १० वाजता रेवणगाव येथील श्री हनुमान मंदिरातून श्रींची पालखी श्री वेताळगुरूदेव मंदिराकडे प्रस्थान करणार आहे. त्यानंतर तेथे महाआरती व शोभेचे दारूकाम होणार असून, पहाटे ४ ते ६ या वेळेत वेताळगुरूदेवाला पालखीची प्रदक्षिणा व छबीनाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी लोकनाट्य तमाशा आणि कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे. श्री वेताळगुरूदेव दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार असल्याने भाविकांच्या सुरक्षेसाठी विटा पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.