सदानंद औंधे - मिरज -सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका असलेल्या महापालिका क्षेत्रातील शहरी बस सेवेचा तोटा वाढत असून सांगली व मिरज या दोन्ही आगारांना दरमहा दहा लाखांचा तोटा होत आहे. ८० बसेसद्वारे दरमहा सुमारे पाच लाख किलोमीटर अंतराच्या फेऱ्या करणाऱ्या प्रत्येक शहरी बसेसची दररोजची सरासरी प्रवासी संख्या ३२० एवढीच आहे. सांगली-मिरज शहरापासून २० कि.मी. अंतरापर्यंत शहरी बससेवा देणाऱ्या एसटीचे प्रवासी कमी होत असल्याने तोट्यातही वाढ होत आहे. मिरज आगाराच्या ४० व सांगली आगाराच्या ४० अशा ८० बसेस दररोज पहाटे पाचपासून रात्री ११ पर्यंत शहरी बससेवा करतात. शहरी बससेवेमुळे शहरातील व शहरालगत असलेल्या २४ गावांतील प्रवाशांची सोय झाली आहे. पण प्रवाशांनी पाठ फिरविल्याने गेल्या दहा वर्षात शहरी बस सेवेच्या तोट्यात वाढ होत आहे. मिरज व सांगली आगाराच्या शहरी बसेस दररोज पंधरा ते सोळा हजार कि.मी. फेऱ्या करतात. शहराचा विस्तार, लोकसंख्या व प्रवासी संख्या वाढल्यानंतरही शहरी बसने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. सांगली व मिरज आगारातील शहरी बसेसच्या प्रवाशांची सरासरी संख्या दरमहा २५ ते २६ हजार आहे. ही संख्या प्रतिबस ३२० एवढीच असल्याने दोन्ही आगारांना कोट्यवधीचा वार्षिक तोटा होत आहे. अवैध प्रवासी वाहतूक, परवानाधारक प्रवासी वाहतूकदारांच्या व दुचाकी वाहनधारकांच्या संख्येत वाढ, अनियमित बसफेऱ्या, बसेसची दुरवस्था अशा विविध कारणांमुळे शहरी बसेसचे प्रवासी कमी होत आहेत. तोट्यात असल्यामुळे शहरी बसेसच्या ताफ्यात एकही नवीन बस आली नसल्याचे सांगितले.महापालिकेचा नकारशहरी बससेवा महापालिकेने ताब्यात घ्यावी यासाठी एसटीचे प्रयत्न आहेत. मात्र आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याच्या कारणावरून महापालिकेने तोट्यातील शहरी बससेवा चालविण्यास नकार दिल्याने तोट्याचा भार एसटी सहन करीत आहे. तुलनेने संख्या कमीशहरी बससेवा फायद्यात येण्यासाठी सध्याची सरासरी प्रवासी संख्या दुप्पट होणे आवश्यक आहे. एका वडाप रिक्षातून दररोज दिवसभरात ८० ते ९० प्रवाशांची वाहतूक होते. या तुलनेत शहरी बसेसची प्रवासी संख्या अत्यंत कमी आहे.
शहरी बस सेवेला प्रवाशांचा ठेंगा
By admin | Published: December 02, 2014 10:34 PM