सांगली : साहित्य क्षेत्रात स्त्री सजग होत आहे. उपरोधक का होईना त्या स्वत:बद्दल बोलू लागल्या आहेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. बोलणारी, लिहिणारी स्त्री लोकांना आवडत नाही. त्यांच्या लेखनातही अडथळे आणले जात असल्याची खंत ज्येष्ठ लेखिका व कवयित्री प्रा. डॉ. प्रतिमा इंगोले यांनी बुधवारी व्यक्त केली.
येथील प्रयोगशील लेखिका प्रतिभा पद्माकर जगदाळे यांच्या ‘भावतरंग’ काव्यसंग्रहासह भावनांच्या हिंदोळ्यावर व अनुबंध या दोन ललित लेखसंग्रहांच्या दुसºया आवृत्तीचे प्रकाशन डॉ. इंगोले यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे होते. यावेळी डॉ. तारा भवाळकर, प्रा. वैजनाथ महाजन, डॉ. अनिल मडके, प्रा. डॉ. बी. डी. पाटील उपस्थित होते.
प्रा. इंगोले म्हणाल्या की, लेखिकेचा नवरा तिचा पहिला टीकाकार असतो. तिच्या लेखनकलेत अडथळे आणले जातात; पण हा नियम पुरुष लेखकाला नसतो. आजची स्त्री सजग झाली आहे. ती ऐकत नाही. म्हणून नाईलाजास्तव लेखिका म्हणून तिचा स्वीकार केला जातो. जगदाळे यांनी लिहिलेल्या कवितांतून अस्वस्थता प्रकट होते.
प्राचार्य लवटे म्हणाले, प्रतिभा जगदाळे यांच्या कविता भारतातील स्त्रियांनी सर्व पुरुषांना संबोधून केल्याची जाणीव होते. त्यात अनेक छटा आहेत. हा कवितासंग्रह अव्यक्त स्त्रीचे समर्पण आहे.डॉ. भवाळकर म्हणाल्या, हजारो कविता येत असतात; पण त्या कवितांतून लेखकाला लय सापडली का, असा प्रश्न पडतो. पण जगदाळे यांना ही लय सापडली आहे. त्यांच्या कवितांतून तळमळ, तडफड, अस्वस्थता उमटते.
प्रतिभा जगदाळे म्हणाल्या, आजवर स्त्रियांच्या भावविश्वावर लिखाण केले आहे. त्यांच्या जीवनाला अनेक कंगोरे असतात. त्यांचे जीवन आव्हानात्मक असते. अस्वस्थ घटना, गझल, काव्य लिहिले. भावतरंग काव्यसंग्रह लिहिण्यासाठी चार वर्षे तयारी केली. प्रा. पद्माकर जगदाळे यांनी स्वागत, तर प्रा. भीमराव पाटील यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास प्रा. गौतमीपुत्र कांबळे, माजी महापौर किशोर जामदार, डॉ. मोहन पाटील, दिनकर जगदाळे, नामदेव माळी, दयासागर बन्ने, नामदेव भोसले, सुनीता बोर्डे, लता ऐवळे, अर्चना मुळे, डॉ. नंदा पाटील, डॉ. वसुंधरा पाटील उपस्थित होत्या. डॉ. प्रभा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.