जिल्ह्यात कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी मार्च महिन्यात मिरज सिव्हिलचे कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात आले. येथे कोरोना रूग्णांवर उपचारासाठी ३७५ कॉटची व्यवस्था असून ८० डाॅक्टर्स व २५० परिचारिका कार्यरत आहेत. गेल्या नऊ महिन्यात कोरोनासंशयित म्हणून व तपासणीसाठी ९ हजार ३०० रुग्ण दाखल झाले. त्यापैकी ४ हजार २०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. इतर पाच हजार रुग्णांना न्यूमोनिया व इतर आजार आढळले. नऊ महिन्यात कोविड प्रयोगशाळेत १ लाख २० हजार जणांची तपासणी करण्यात आली. रुग्ण वाढत गेल्याने जूनपासून व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यात आली. कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या ३६० पाॅईंटची व्यवस्था व ६ केएल ऑक्सिजन टॅंकची व्यवस्था करण्यात आली. रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाने रुग्णालयाच्या पॅथाॅलाॅजी विभागात आणखी ७५ बेडची व्यवस्था केली. कोरोनाबाधितांवर रुग्णालयातील डाॅक्टरांच्या पथकाने १४ दिवस उपचार करुन त्यांना जीवदान देण्याचे काम केले. रुग्णालयात मृत्यू झालेल्या सहाशेजणांपैकी बहुसंख्य मृत्यू ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झाले. कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संसर्गालाही तोंड द्यावे लागले. रुग्णसेवा करणारे सुमारे ९० डाॅक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. नोव्हेबरपर्यंत फु्ल्ल असलेल्या मिरज कोविड रुग्णालयात सध्या केवळ ६६ रुग्ण उपचार घेत आहेत. मिरज सिव्हिलमधील डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे कोरोनाच्या आव्हानाचा मुकाबला करताना मृत्यूदर आटोक्यात राहिला.
चाैकट
रुग्णांच्या मृत्यूचे परीक्षण
कोराना रुग्णांच्या मृत्यूचेही परीक्षण करण्यात आल्याचे अधिष्ठाता डाॅ. सुधीर नणंदकर यांनी सांगितले. आता केवळ २० टक्के रुग्ण असले तरी, कोविड रुग्णालय बंद करण्यात येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
चाैकट
परिचारिका, सफाई कामगारांचेही याेगदान
कोरोना संसर्गाची भीती असतानाही रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांना दहा दिवस काम केल्यानंतर १४ दिवस त्यांच्या कुटुंबापासून दूर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा कोरोनाबाधितांची सेवा केली. सफाई कर्मचाऱ्यांनीही आपले योगदान दिले.